आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची अजित पवार यांच्या राष्ट्रावादीसोबत युती असल्यामुळे बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.
उदगीर (जि. लातूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी (ता. ११) भाजपला मोठा धक्का दिला. उदगीर (Udgir) भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी मंत्री राजेश टोपे, बसवराज पाटील नागराळकर, महेबुब शेख यांच्यासह भालेराव समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील विधानसभेच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने सुधाकर भालेराव यांना डावलले आणि डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. संजय बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असून सध्या ते राज्याचे क्रीडामंत्री आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची अजित पवार यांच्या राष्ट्रावादीसोबत युती असल्यामुळे बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. त्यामुळे भाजपकडून आगामी विधानसभेसाठी आपल्याला संधी मिळणार नाही, हे निश्चित झाल्यानंतर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. भालेराव हे २०१९ पासून उदगीर मतदारसंघात सक्रिय नव्हते. भाजपच्या काही ठराविक कार्यक्रम व बैठकाचा अपवाद सोडला, तर कार्यकर्त्यांच्याही फारशा संपर्कात नव्हते.
महाविकास आघाडीत उदगीरची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे बनसोडे व शरद पवार गटाचे भालेराव यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.