गंगाखेड (जि. परभणी) : दक्षिणेची काशी म्हणून गोदावरी नदीची ओळख आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक येथून उगम पावणाऱ्या नदीचे पात्र हे गंगाखेड शहरातून जाते. याची दखल घेत अहिल्याबाई होळकर यांनी गोदावरी नदी काठावर घाटाची निर्मिती केली. याठिकाणी महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून नातेवाईक या घाटावर दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येतात. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात गंगाखेड येथील घाट प्रसिद्ध असून दररोजच दशक्रिया विधीसाठी नागरिकांची या घाटावर गर्दी असते. परंतु नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्यामुळे नातेवाईकांना यातना सोसाव्या लागत आहेत.
गंगाखेड शहराला प्राचीन इतिहास आहे. गंगाखेड शहरातील दसरा महोत्सवाला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. तसेच शहरालगत गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या अहिल्याबाई होळकर निर्मीत घाटचाही चारशे वर्षांचा इतिहास आहे. यामुळे गंगाखेड शहरातील गोदावरी नदी तसेच या घाटाचा प्रसार व प्रचार महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये पोहोचला. मृत्यूपश्चात नातेवाईक अस्थिविसर्जन करण्यासह दशक्रिया विधीचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी गंगाखेडच्या गोदा घाटाची निवड करतात.
नातेवाइकांना होतोय पश्चाताप
परंतु शहरातील या घाटावर आल्यानंतर नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या घाटालगत असलेल्या परिसरात कुठलीही मूलभूत सुविधा नाही. या ठिकाणी जेवण तर सोडाच साधा चहासुद्धा उपलब्ध होत नाही. गोदापात्रात दशक्रिया विधीचे कार्यक्रम आटोपल्यानंतर गोदापात्रात महिला स्नान केल्यानंतर त्यांना कपडे बदलण्यासाठी जागा नाही. घाटालगतच गोदापात्रात शहरातील नाल्यांचे घाण पाणी सोडलेले आहे. यामुळे याठिकाणी असलेल्या नाली मिश्रित पाण्यातच नातेवाईकांना स्नान करावे लागते. गोदापात्रात कॅरीबॅग, कचरा नेहमीच असतो. यामुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना दशक्रिया विधीच्या कार्यक्रमास गंगाखेड येथे आल्याचा पश्चाताप होत असल्याचे अशोक कुलकर्णी (औरंगाबाद), किशन वडगावकर (धारुर, जि.बीड) यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
नगरपालिकेने सुविधा उपलब्ध करून द्यावी
गंगाखेड नगरपरिषदेच्या वतीने गोदा पात्रालगत असलेल्या घाटाच्या परिसरात दुकानांची उभारणी केलीतर नगर परिषदेस उत्पन्न मिळेल. तसेच शहरातील बेरोजगारांना व्यवसायाची संधी निर्माण होईल. त्याचबरोबर दशक्रिया विधीसाठी आलेल्या नातेवाईकांना या ठिकाणी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. जेणेकरून शहरातील दशक्रिया विधीसाठी महाराष्ट्रासह परराज्यात प्रसिद्ध असलेल्या घाटाच्या सुविधेबद्दल सकारात्मक प्रसार व प्रचार होईल.
नगरपालिकेने कर्मचारी वाढवावेत
गंगाखेडच्या गोदा घाटावर मी अनेक दिवसांपासून स्वच्छता करतो आहे. घाटावर नृसिंह, हनुमानाचे मंदिर आहे. महाराष्ट्रासह परराज्यातून नातेवाईक येथे दशक्रियेसाठी येत असल्याने नगरपालिकेने सफाई कामगार वाढवून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा, असे वाटते.
- नामदेव नारायण गिरम (गंगाखेड, जि. परभणी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.