गंगापूर - येथील मुक्तानंद महाविद्यालयात दोन व तीन डिसेंबरला ४३ वे मराठवाडा साहित्य संमेलन होत असून गंगापूर नगरी सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे.
आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकारातून गंगापूर नगरीत पहिल्यांदाच असे संमेलन होत आहे. संमेलनाध्यक्ष नांदेडचे ज्येष्ठ लेखक डॉ. जगदीश कदम असून माजी आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ स्वागताध्यक्ष आहेत. शनिवारी (ता.२) सकाळी साडेआठला ग्रंथदिंडीचे पूजन होईल. गंगापूर शहर ते कविवर्य ना. धों. महानोर साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी निघेल. सकाळी दहाला पूर्व संमेलनाध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांच्या हस्ते साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे ग्रंथनगरीचे उद्घाटन होईल.
कविसंमेलन, परिसंवाद
मुख्य उद्घाटन सोहळा जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी होईल. त्यानंतर दुपारी दीडला राज्यातील निवडक नामवंत कवींच्या सहभागाने कविसंमेलन होईल. देविदास फुलारी अध्यक्षस्थानी असतील. रात्री आठला प्रा. राजेश सरकटेनिर्मित ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ हा मराठवाड्यातील कवितेचा ८०० वर्षांचा इतिहास मांडणारा काव्यगायनाचा कार्यक्रम होईल.
रविवार (ता.३) सकाळी साडेनऊला ‘कवी-गीतकारांशी संवाद’ या कार्यक्रमात मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख, दासू वैद्य, सुचिता खल्लाळ, विनायक पवार यांचा सहभाग असेल. समिता जाधव त्यांच्याशी संवाद साधतील. संमेलनात दोन दिवसांत विविध विषयांवर पाच परिसंवाद होतील.
गंगापूरच्या नवोदित कवींना स्थान
स्थानिक कवींसाठी ‘कवी गंगापूरचे’ हे तिसरे ‘कविसंमेलन’ संतोष आळंजकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. संमेलनाचा समारोप कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत रविवार (ता.३) सायंकाळी साडेपाचला होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.