सोनपेठ : अनोळखी तरुणीशी ऑनलाइन झालेली ओळख. कंमेट, लाइक्सनंतर चॅटिंग. हळूहळू व्हॉइस कॉल ते व्हिडिओ कॉल अन् या कॉलवरील आक्षेपार्ह अवस्थेतील रेकॉर्डिंग यामुळे सध्या काही तरुण प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. अशा प्रकारे जाळ्यात ओढून नंतर ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यात काही जण गुपगुमान पैसे देत आहेत तर काहीजण मानसिक तणावात आहेत. त्यामुळे असा प्रकार घडूच नये, याची काळजी घ्यावी. घडलाच तर पैसे न देता पोलिसांची मदत घ्या, असा सल्ला पोलिस देत आहेत.
इंस्टाग्राम, फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर व्हिडिओ कॉलवर बोलून त्याचे अश्लील चित्रीकरण करायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याचे असे असंख्य प्रकार घडत आहेत. अशा व्हिडिओ कॉलला टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. ट्विटर, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा विविध सोशल नेटवर्कच्या ॲपवर अनेकजण सक्रिय आहेत.
या माध्यमातून नागरिक सातत्याने मनमोकळं व्यक्त होत असतात. अनेकांना तर याचे व्यसनच लागले आहे. आहारी गेलेल्या या लोकांना सहज फसवण्याचा व्यवसाय सध्या जोरात आहे. सुंदर मुलींचे फोटो प्रोफाइलला लावून मैत्रीची विनंती पाठवली जात आहे. त्यात व्यसनाधीन झालेली तरुणाई अलगद जाळ्यात अडकते. यामध्ये प्रामुख्याने मेसेंजरवर त्यांना रात्री अपरात्री गप्पा मारून भुलवल्या जाते. नंतर त्या चर्चेत अगळपगळ श्रृंगारिक बोलून व्हिडिओ श्रृंगारासाठी आमंत्रित केले जाते.
या व्हिडिओ कॉलचे आक्षेपार्ह छायाचित्रिकरण करून संबंधिताला वैयक्तिक पाठवले जाते; तसेच हे चित्रीकरण संबंधितांचे नातेवाईक, मित्रांना आणि इतरत्र पाठवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात येते. पैसे न दिल्यास पोलिसांची धमकी देऊन पोलिसांत जाण्याची भीती दाखवली जाते. एवढेच नाही तर पोलिसांच्या नावाने फेक ऑडिओ व्हिडिओ फोन कॉलही करण्यात येतात. त्यामुळे घाबरून पीडित तरुण हे पैसे देतात. लज्जा, प्रतिष्ठा यामुळे पीडित पोलिस ठाण्यात तक्रार देत नाहीत. असे प्रकार काही दिवसांपासून वाढीस लागले आहेत. त्यामुळे मोहाला बळी न पडता काळजी घ्यावी, असे काही घडलेच तर पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नेमके काय करतात?
जुजबी माहिती देणारा पहिला मेसेज टाकला जातो.
नंतर गोड बोलून संभाषण वाढवले जाते.
वारंवार संवाद साधल्यानंतर अश्लील संवाद.
नंतर शारीरिक संदर्भातील व्हिडिओ संवाद
याचाच फायदा घेऊन स्क्रीन रेकॉर्ड केले जाते.
इथून ब्लॅकमेल केले जाते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी कुठलीही चर्चा न करता व्हिडिओ कॉल टाळावेत. तसेच फसलेल्या नागरिकांनी व तरुणांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी.
- संदीप बोरकर, सहायक पोलिस निरीक्षक, सोनपेठ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.