भोकरदन : आजच्या काळात उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातूनही अनेक मुले परदेशात जात आहेत. मात्र बहुतेक विद्यार्थी रशियात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र भोकरदन येथील वैष्णवी सुनील देशपांडे या तरुणीने इतरांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे धाडस केले व इंग्लंड येथून कोव्हेंट्री विद्यापीठातून ग्लोबल हेल्थ केअर मॅनेजमेंटची उच्च शिक्षणाची पदवी घेणारी ती तालुक्यातील पहिली तरुणी ठरली आहे.
वैष्णवीचे शालेय शिक्षण शहरातील श्री गणपती विद्यालयात झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यालयातून फिजीओथेरपीची तिने पदवी घेतली. शिक्षणासाठी बाहेर देशात जाण्याचे व वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे तिचे ध्येय सुरुवातीपासूनच होते.
सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील वैष्णवीचे वडील सुनील देशपांडे मुद्रांक विक्रेते व आई माधवी देशपांडे गृहिणी आहे. तिने इंटरनेटवर ग्लोबल हेल्थ केअर मॅनेजमेंटबद्दल माहिती गोळा केली व नावाजलेल्या कोव्हेंट्री विद्यापीठात प्रवेश मिळविला. नुकतेच उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या गुणांनी पदवी देखील तिने मिळविली.
आरोग्य क्षेत्रातच संपूर्ण करिअर करायचे असल्यामुळे तिने कॅफे व डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम न करता एका केअर होममध्ये मॅनेजमेंटची ती नोकरी करत आहे. या केअर होममध्ये प्रामुख्याने लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या पाल्यांची काळजी व त्यांच्यावर उपचार केले जातात. या नोकरीचा तिला शिक्षणासाठी व अनुभवासाठी मोठा फायदा झाला.
पाश्चात्त्य देशांमध्ये मानसिक स्वास्थ्याला फार महत्त्व आहे. येथे मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास असल्यास त्याची विशेष काळजी घेतली जाते. तशा अत्याधुनिक सुविधा, रुग्णालये देखील आहेत. तर ग्लोबल हेल्थ केअर मॅनेजमेंटमुळे संपूर्ण जगात वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करण्याची आजच्या पिढीला चांगली संधी आहे असे तिने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
फ्रेडरिक्स अटॅक्सिया, हा खरं तर एक दुर्मीळ आनुवंशिक विकार आहे, जो मज्जासंस्थेवर परिणाम करतो. यावर तिचा आढावा प्रकाशित झालेला आहे. तसेच देशातील उत्तराखंडसारख्या पहाडी व दुर्गम भागात शस्त्रक्रियेनंतर होणारा संसर्ग याचे प्रमाण जास्त आहे. यावर सर्व समावेशक सुरक्षा कार्यक्रमाचा लघू प्रबंध देखील तिने पूर्ण केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्लोबल हेल्थ केअर मॅनेजमेंटच्या पदवीचा फायदा होतो. आपल्या देशात बरीच मुले अभ्यास करताना लिहायला त्रास होतो असे म्हणत कंटाळा करतात. शिवाय बोलताना, लिहिताना देखील अडखळतात. याकडे पाल्यांनी दुर्लक्ष करण्यापेक्षा हा देखील एक लर्निंग डिसऑर्डरचा प्रकार असून असून त्यावर योग्य उपचार करण्याची गरज आहे.
—डॉ.वैष्णवी देशपांडे, फोजीओ, वेस्ट मिडलॅण्ड, इंग्लंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.