Gopinath Munde Jayanti : संघर्षयोद्धा-लोकनायक श्री गोपीनाथराव मुंडे

राजकारणाचा कोणताही वसा-वारसा लाभला नसतांना स्वतच्या कर्तृत्वावर यश
Gopinath Munde
Gopinath Mundesakal
Updated on

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकारणाच्या पटलावर बोटांवर मोजण्याएवढी राजकारणी धुरंधर आहेत ज्यांनी आपापल्या हयातीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून भारताच्या राजकारणात आपली छाप उमटवली. या धुरंधर मंडळींमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्री वसंतराव नाईक, लेखक-वक्ते श्री प्र.के.अत्रे, प्रमोदजी महाजन, अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, भारताचे विद्यमान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि याच महानुभावांच्या रांगेतील अगदी सन्मानाने घेतले जाणारे नाव म्हणजे मराठवाड्याचे सुपुत्र स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब! ही सर्वच नावे तिसऱ्या जगातील असून

यांना राजकारणाचा कोणताही वसा-वारसा लाभला नसतांना स्वतच्या कर्तृत्वावर यशाची अनेक शिखरे त्यांनी सर करून आपापल्या काळावर आपला चिरकाल ठसा उमटवला! ही सगळीच मंडळी उपेक्षित-वंचित परिस्थितीतून येऊन मोठी झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवनच संघर्षात गेले. काही काळ संसदेत काम करण्याची संधी मिळाली असता तिथेही उपेक्षेचे चटके सोसावे लागले परिणामी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाबासाहेब मंत्रिमंडळाबाहेर पडले.

जवळपास या सर्वच लोकांच्या जीवनात टोकाचा संघर्ष करण्याची वेळ आली आणि त्यंनी ती मोठ्या ताकदीने पेलून आपले अस्तित्व निर्माण केले. याच प्रकारचा खडतर जीवन-संघर्ष स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वाट्याला आला, परंतु मुंडे साहेब जीवनभर कुठेही न झुकता आपला संघर्ष करत राहिले आणि इतिहासाच्या पानावर त्यांचा अजोड संघर्ष अजरामर राहिला!

मराठवाड्याच्या मागास बीड जिल्हातील उसतोड कामगारांच्या डोंगरपट्ट्यातल्या परळी तालुक्यातील नाथ्रा गावात स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकांत जन्मलेले गोपीनाथ मुंडे म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव! परळी तालुक्यातील नाथ्रा गावापासून ते युनोमध्ये भारताचे प्रतिनिधित्व आणि भारतीय संसदेत केंद्रीय मंत्रिपदांपर्यंतचा प्रवास काही एवढा सहज आणि एका ओळीत लिहिण्यासारखा नक्कीच नाही! अंबाजोगाईच्या महाविद्यालयातून सुरु झालेला गोपीनाथराव मुंडे साहेबांचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे.

स्व.प्रमोदजी महाजन यांच्यासोबतची मैत्री मुंडे साहेबांच्या जीवनात एवढी अमुलाग्र क्रांती आणेल याची कुणाला तिळभरसुद्धा कल्पना नव्हती. महाजन-मुंडे या महाविद्यालयीन स्तरावरील जोडीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाले. घरचे वारकरी संस्कार मुंडे साहेबांना जीवनभर कामाला आले. वडील पांडुरंगराव मुंडे हे लहानग्या गोपीनाथला कीर्तन-भजनाला घेऊन जायचे. दुर्दैवाने वयाच्या विसाव्या वर्षी वडिलांचे निधन झाले आणि पुढील शिक्षणाची जबाबदारी मोठ्या सक्षमपणे मुंडे साहेबांचे जेष्ठ बंधू पंडितअण्णानी उत्तमपणे पेलली. गोपीनाथरावांचे शिक्षण बंद पडू दिले नाही. अण्णांनी गावाकडील शेती-बाडी सांभाळून गोपीनाथराव मुंडे साहेबांचे शिक्षण बंद पडू दिले नाही. दुसरीकडे गोपीनाथराव पुणे येथे जनसंघाच्या चळवळीने झपाटून गेले.

तिथे वसंतराव भागवतांच्या संस्काराने त्याची देशभक्तीची विचारसरणी दृढ झाली. पुण्यात विद्यार्थी संसदेच्या निवडणुका, नंतर जनसंघ आणि शेवटी भाजपाच्या प्रचारकार्यात मुंडे-महाजन जोडगोळीने प्रवेश केला. शेठजी-भटजींचा पक्ष असा शिक्का बसलेल्या भाजपला पुणे-मुंबई आणि अन्य शहरातून बाहेर काढून विदर्भ, कोकण, मराठवाडा आदि सर्व भागात नेऊन पोहचवण्याचे मूलगामी कार्य मुंडे-महाजन जोडगोळीने मोठ्या हिमतीने केले. बाहेर प्रचार करतांना गोपीनाथराव मुंडेंचे लक्ष आपल्या परळीवर होतेच. १९७८ च्या बीडच्या जि.प. निवडणुकीत अंबाजोगाईच्या उजनी गटातून ते बीड जिल्हापरिषदेवर निवडून आले आणि त्यांनी पुन्हा मागे वळून पहिलेच नाही!

१९८० मध्ये निवडणुका लागल्या आणि तिशीतील गोपीनाथराव मुंडेंनी परळी मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा! पहिल्यांदाच मराठवाड्यातून आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून भाजपच्या नावाखाली निवडून येण्याचा सन्मान गोपीनाथराव मुंडेंना मिळाला. त्यानंतर एकावर एक संधी त्यांना मिळत राहिल्या आणि त्यांनी त्या सर्वच संधींचे सोने केले. पुढे भाजयुमो चे प्रदेशाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा एक ना अनेक संधी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळाल्या.

या पदांचा फायदा मुंडे साहेबांनी आपल्या पक्षाला मोठ्याप्रमाणात करून दिला. श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांमध्ये असलेला शेटजी-भटजींच्या भाजपची पाळेमुळे बहुजन समाजाच्या मनामनात खोलवर रुजविण्याचे श्रेय मुंडे-महाजन जोडगोळीला जाते! गोपीनाथराव मुंडे साहेबांनी राजकारणात अनेक दैवी वरदान असल्यासारखे महान कार्य करून दाखवले. भाजप पक्षांत अठरापगड जातींच्या लोकांच्या चुंबकासारखे खेचण्याचे काम मुंडेच्या व्यक्तिमत्व आणि कर्तृत्वाने केले. बहुजन समाजासाठी राजकारणात असलेला अवकाश मोठ्या शिताफीने मुंडे साहेबांनी भरून काढला.

साळी-माळी-धनगर-बंजारा-वंजारी-मुसलमान सारखी उपेक्षित वंचित जाती-धर्माच्या लोकांना देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात खेचून आणण्याचे महान कार्य गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केले! एवढेच काय उपेक्षित आणि दुर्लक्षित मराठा समाजाच्या नव्यानेतृत्वाला भाजपमध्ये संधी देऊन सर्व जातींची एक मजबूत मोठ बांधण्याचे कार्य मुंडे साहेबांनी केले.

एकानंतर एक पदांवर काम करतांना १९९२ ते १९९५ काळात गोपीनाथरावांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधीपक्षनेता म्हणून काम केले. इथेच मुंडे साहेबांची उरलीसुरली ओळख महाराष्ट्राच्या तमाम जनतेला झाली. थोड्याच काळात गोपीनाथराव हे भाजप आणि उपेक्षितांचा चेहरा बनले. या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, रात्रंदिवस प्रवास, गावोगाव-खेड्यापाड्यातील सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेऊन जनसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत केला. 

लाखोंच्या सभा जिंकण्याचे कसब, खडा आवाज, भारदस्त व्यक्तिमत्व, ग्रामीण आणि शहरी लोकांची नाडी पकडून-लोकांचा प्रतिसाद घेऊन बोलण्याची संभाषण कलेच्या देणगीने गोपीनाथरावांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. एक दशकांच्या कामात मुंडे साहेब महाराष्ट्रातील ओबीसी आणि वंचित-शोषितांचा चेहरा झाले. त्यांनी १९९४ साली संघर्ष यात्रा काढून राजकारणातील गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचार, जळगावचे सेक्स स्कँडल यातून मुंडे साहेबांनी महाराष्ट्रभर रान उठवले. तत्कालीन सरकारवर विधानसभेत आणि विधानसभेबाहेर घणाघाती हल्ले करून सरकारमधील मंत्र्यांना नामोहरम केले. महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे नावाचे नवे वादळ घोंगावत होते आणि त्या वादळात भल्याभल्यांचे राजकीय मनसुबे धुळीला मिळाले!

याचा कळस म्हणजे मुंडे साहेब दोनवेळा बीड मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले. लोकनेते गोपीनाथराव आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने केंद्रात भाजपचे बहुमत आले आणि श्री नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात गोपीनाथरावांना केंद्रीय ग्रामविकासमंत्री हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले! दुर्दैवाने हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही आणि ३ जून रोजी मुंडे साहेबांचे अपघातात निधन झाले! महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झाली. राजकारणाच्या आणि जात-धर्म या पलीकडे आपली ओळख निर्माण करणारा असा लोकनेता पुन्हा होणे नाही.

विद्यमान काळात राजकारणाने कूस बदलली असून अनेक नवनवीन समीकरणे समोर येतांना मतदार गोंधळून गेला आहे. मा. शरदचंद्रजी पवार आणि मा. नितीनजी गडकरी या एक-दोन नेत्यांशिवाय सर्वच महाराष्ट्राचे भले करणारे सर्वसमावेशक मुंडे साहेबांसारखे नवे नेतृत्व उभे राहणे गरजेचे आहे. राजकारणातील कट्टरतेचे निर्मुलन करून लोकांची कामे करणाऱ्या लोकनेत्याची नितांत गरज आज महाराष्ट्राला आहे. आजही सामान्य आणि सर्वच लोक 'आज गोपीनाथराव मुंडे साहेब असते तर असे झाले नसते' असे भावनिक उद्गार काढतांना एकूण मन व्यथित होते! चला पुन्हा एखादे गोपीनाथराव मुंडे उद्यांस येतील अशी प्रतीक्षा करून स्व.मुंडे साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.