‘तांबेरा’च्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याचे उत्पन्न घटले, शेतकरी अडचणीत

‘तांबेरा’च्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याचे उत्पन्न घटले, शेतकरी अडचणीत
Updated on

मदनसुरी (जि.निलंगा) ः यावर्षी मदनसुरी परिसरात परतीचा पाऊस चांगला झाला असल्याने गहू, हरभरा, ज्वारी, करडई या रब्बीच्या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जमिनीत ओलावा जास्त झाल्याने रब्बीची पिके चांगली आली. मात्र फळलागवड झाल्यावर शेवटच्या टप्प्यात ‘तांबेरा’ या रोगाचा प्रादुर्भाव हरभरा या पिकावर झाल्याने फुले आणि घाटे गळून गेले. त्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे.


निलंगा तालुक्यातील दहा मंडळांत निलंगा पाच हजार पाचशे, कासारसिरशी दोन हजार सहाशे, औराद शहाजनी पाच हजार दोनशे, कासार बालकुंदा चार हजार एकशे पन्नास, अंबुलगा चार हजार सातशे, पानचिंचोली चार हजार दोनशे, भूतमुळी चार हजार एकशे, हलगरा तीन हजार दोनशे, निटूर दोन हजार सातशे असे एकूण बेचाळीस हजार दोनशे हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. दहा मंडळापैकी सर्वाधिक मदनसुरी मंडळात पाच हजार सहाशे हेक्टरवर हरभरा, एक हजार दोनशे ज्वारी, तीनशे हेक्टर करडई, तर गहू दोनशे ७५ हेक्टरवर रब्बी पिकाचा पेरा आहे.


मदनसुरी मंडळात यावर्षी एक हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. जमिनीत ओलावा झाल्याने हरभरा हे पीक चांगले आले. फळाची लागण झाल्यावर अळीचा प्रादुर्भाव झाला असता कीटकनाशके फवारणी करून शेतकऱ्यांनी त्याला आटोक्यात आणले. मात्र यावर्षी हरभरा पिकाचे चांगले उत्पादन निघेल असे वाटत असतानाच ‘तांबेरा’ या रोगाच्या प्रादुर्भावाने हरभरा हे पीक पूर्णतः करपून गेले आणि शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान झाले. यावर्षी अतिवृष्टीमुळे सर्वाधिक सोयाबीनचे नुकसान झाले होते. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी खरिपातील सोयाबीन आणि रब्बीतील हरभरा ही प्रमुख आर्थिक उत्पन्न देणारी पिके आहेत. सोयाबीन अतिवृष्टीमुळे तर हरभरा ‘तांबेरा’ रोगामुळे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जरी विमा भरून घेतला नसला तरी शासनाने हरभरा पिकाची झालेली नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहे.

पीकविमा कंपनीने विमा स्वीकारला नाही
शेतकऱ्‍यांना पीकविम्याचे संरक्षण देण्यासाठी बजाज, रिलायन्स, टाटा एआयजी, एचडीएफसी, ओरिएंटल, भारतीय कृषी विमा कंपनी भाग घेतात. मात्र यावर्षी रब्बीच्या पीकविम्याचे कोणत्याही कंपनीने टेंडर भरले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीचा पीकविमा भरता आला नाही. त्यामुळे ‘तांबेरा’ या रोगामुळे झालेल्या रब्बी पिकाची नुकसान भरपाई कोण देणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.


शासनाने टेंडर काढूनही काही अडचणीमुळे विमा कंपनीने टेंडर भरले नाहीत. शासनाने उपसमिती नेमली आहे. तालुक्यात पीक कापणी प्रयोग चालू असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे.
- संजय नाबदे, कृषी अधिकारी, निलंगा

तांबेरा या रोगामुळे हरभरा पीक चार दिवसांत होत्याचे नव्हते झाले आहे. जागेवर पीक करपून गेले, खरीप अतिवृष्टीमुळे गेले आणि रब्बी रोगामुळे गेले. रब्बीचा विमा जरी भरून घेतला नसला तरी शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे.
- अंगद सुरवसे, रामतीर्थ, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.