शिऊर (जि. औरंगाबाद) - "औंदा चाऱ्याचे लई वांधे झालेत बघा! चरायला काय बी न्हाई. पाय मोकळा होतू म्हून काळ्या रानात जनावरं हिंडून-फिरून आणत्यात. कुठंमुठं दिसणारा पालापाचोळा घोळून घोळून चघळीत्यात...''
तलवाडा (ता. वैजापूर) येथील सावित्राबाई भागचंद सोनवणे यंदाच्या दुष्काळाची करुण कहाणी सांगत होत्या. हे संकट साधं नाही, हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. त्या सांगू लागल्या, "आमचं आठ माणसांचं खटलं हाय. तीन एकर कोरडवाहू शेतीत भागत न्हाय. यंदा तं तडक दोन गोण्या बाजरी अन् चार कुंटल मका झाली. त्याला एक हजार अन् शंभर रुपये भाव मिळाला. कुठं काम असलं तं मालक अन् एक मुलगा मजुरीला जात्यात. दुसरा मुलगा ट्रॅक्टरवर ड्रायव्हर हाय. सात गाई, तीन बैलं हाईत, पर चाऱ्याचे लई वांधे झाले. काय करावं समजंना गेलंया...''
यंदा कमी पाऊस पडल्यामुळे तलवाडा परिसरात खरिपाच्या शेती उत्पन्नात मोठी घट झाली. रब्बीच्या हंगामात पिकांची जेमतेम पेरणी झाल्याने त्याचा थेट परिणाम शेती उत्पन्नावर झाला. यामुळे शेतीचे अर्थचक्र पूर्णत: कोलमडले. शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासमोर रोजी-रोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. वाळत चाललेल्या फळबागा, चारा-पाण्याअभावी रानोमाळ भटकणारे पशुधन जगविण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केला; परंतु उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता दिसते. यंदाचा (उन्हाळा) शेतकऱ्यांसाठी कसोटीचाच ठरणार आहे. तलवाडा परिसरातील शेतकरी, पशुपालक, मजुरांनी व्यथा मांडल्या.
संदीप पवार, जनार्दन पळसकर (मेंढपाळ) : आमचा दोनशे मेंढ्यांचा कळप हाय. वावरं मोकळी झाली पर चरायला गवतच न्हाई. वारा, पाण्यावरच त्याहंचं जीवन झालंय. बंधाऱ्यात
थोडं पाणी हाय. त्याच्यामुळं आम्ही ह्या राहाळात मेंढ्या हिंडून पाण्यावर आणतो.
धोंडीराम बाळा काळे (शेतकरी, शेळीपालक) : आठ एकर कोरडवाहू शेती हाय. सहा-सात कुंटल कापूस, अडीच पोतं बाजरी झालीय. पिकाचा खर्च तेवढा निघला. खंडीभर शेळ्या हाईत. खायला काही न्हाई. हिंडून-फिरून लिंबाच्या, बाभळीच्या पाल्यावर दिवस काढायची येळ आलीय. घरी चार माणसं. पोराला काम लागलं तं ट्रॅक्टरवर मजुरीच्या कामावर जातो. सरकारनंचारा-पाण्याची सोय अन् मजुरांच्या हाताला काम द्याया पायजे. माघंबी दुष्काळ पडले पर आता लई कठीण झालंय. महागाईबी लई वाढलीया.
सोमनाथ राऊसाहेब मगर : साडेचार एकर शेती हाय; पण यंदा उत्पन्न लई घटलंय. सात कुंटल कापूस, अडीच कुंटल मका झाला. सहा-सात परसाची इहीर कोरडीठाक पडलीय. सात जनावरं हाईत. चाऱ्यावारी दुसऱ्याच्या चार एकर शेतात मका सोंगणीचं काम केलं. इकतचा चाराबी मिळंना. दूर गावाचा ठेपा लागलाच तं तिथं जाऊन चारा आणावा लागतोय. वाहतूक खर्च सोडून तीन हजार रुपये प्रतिशेकडा भावाने जवारीचा कडबा घ्यायची येळ आलीय.
श्रावण विष्णू घाडगे (खदान मजूर) : अर्धा किलोमीटरवरील इहिरीचं पाणी ओढून डोक्यावर आणावं लागतंय. लई तरास व्हतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.