मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र होणार

file photo
file photo
Updated on

परभणी : मराठवाडयात पुढील पाच दिवसांत आकाश स्‍वच्‍छ राहून तापमानात वाढ होईल. विशेषत: हिंगोली, लातूर, नांदेड व परभणी जिल्‍ह्यात तापमान ४५ अंशांच्या पुढे जाईल, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिली आहे. वाढत्या तापमानात पिकांची आणि पशुधनाची काळजी घेण्यासाठी विद्यापीठाने सल्ला दिला आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण गायब होऊन तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. परभणी, नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. परभणीत सतत तीन दिवसांपासून तापमान ४४ अंशांवर राहिले आहे. कोरोनाच्या साथीत आता उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन असल्याने घराबाहेर पडण्याची गरज नसली तरी ग्रामीण भागात भारनियमन काळात नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या उष्णतेचा चांगलाच कहर सुरू झाला आहे. असे असताना आता पुन्हा तापमान वाढण्याचा इशारा कृषी विद्यापीठाने दिला आहे. 
परभणी ४४ ते ४५ अंश, उस्मानाबाद ४२ ते ४४ अंश, नांदेड ४४ ते ४६ अंश, लातूर ४३ ते ४५, जालना आणि औरंगाबाद ४३, बीड ४२ ते ४३ आणि हिंगोली ४३ ते ४५ अंशांवर तापमान जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पिकांची काळजी घ्या
काढणीस तयार असलेल्‍या उन्‍हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्‍यावी. सध्‍याच्‍या काळात हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळविणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्‍यावीत. केळी बागेचे उष्‍ण वाऱ्यापासून सरंक्षणासाठी बागेच्‍या दक्षिण व पश्चिम दिशेने नेटचा वापर करावा. केळी बागेत खोडांना मातीचा आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही. तसेच बागेत जैविक आच्‍छादनाचा वापर करावा. द्राक्ष बागेत पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेनुसार एप्रिल छाटणी करावी. द्राक्ष बागेतील छाटणीनंतर लगेच काडीलाहायड्रोजन सायनामाईड (१५ते २५ मिली प्रती लिटर) लावावे जेणेकरून शाखीय वाढ होण्‍यास मदत होते. बागेस ५००  किलो नत्र + २५०  किलो स्‍फुरद + ३०० किलो पालाश प्रति हेक्‍टरी या खताची मात्रा विभागून छाटणीनंतर १५, ३० व ४५ दिवसांनी द्यावी. द्राक्ष बागेस सकाळी पाणी द्यावे. तापमानामुळे आंबा पिकांची प्रत खालाऊ नये म्‍हणून परिपक्‍व झालेल्‍या व काढणीस तयार असलेल्‍या फळांची काढणी शक्‍यतो सकाळी लवकर करून घ्‍यावी. 

भाजीपाला व फुलशेती 
भाजीपाला पिकास पाणी देण्‍यासाठी सूक्ष्‍म सिंचन पद्धतीचा (उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन) वापर करावा. पिकांना पाणी देत असताना शक्‍यतो सकाळी पाणी द्यावे. मोगरा उत्‍पादकांनी मोगरा कळ्यांची सकाळी लवकर काढणी करावी. पूर्ण वाढलेली, घट्ट आणि बंदकळीच्‍या अवस्‍थेत फुले काढावीत.


पशुधनावर ‘लम्‍पी’ आजाराची लागण
 लम्‍पी स्‍कीन डिसीज (एलएसडी) सदृश रोगाची लागण गाय व म्‍हैसवर्गीय पशुधनामध्‍ये मराठवाड्यातील काही ठिकाणी झाल्‍याचे आढळून आले आहे. हा रोग पशुधनास चावणाऱ्या कीटकवर्गीय डास, क्‍युलिकॉईड्स, स्‍टोमोक्‍सिस, टॅबॅनस आदी तसेच गोचीडे आदी  मार्फत प्रसारीत होतो. यासाठी नियंत्रणाचा उपाय म्‍हणजे पशुधनाचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करावे, त्‍यांना सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाहेर चरावयास सोडू नये. गोठ्यातील सर्व स्‍वच्‍छता करून (भिंतीवरील भेगा / गव्‍हाणीखालील कचरा) आदी जमा करून शेकोटी करून जाळूण टाकावा. याद्वारे गोचीडांची अंडी नष्‍ट होऊन त्‍यांची संख्‍या घटते.  पशुधनावर वनस्‍तीजन्‍य कीटकनाशकाचे द्रावण (निंबोळी तेल १५ मिली + कारंज तेल १५ मिली + २ ग्रॅम अंगाचा साबण + १ लिटर पाणी) याप्रमाणे तयार करून पशुधनांच्‍या शरीरावर व गोठ्यामध्‍ये सर्वत्र फवारावे. हे द्रावण दर तीन दिवसांनी फवारावे. कीटकांची, गोचीडांची संख्‍या अमर्याद झाल्‍यास पशुवैद्यकतज्ञ डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी. रोगी जनावरांची तत्‍काळ सुश्रुषा करून त्‍यास इतर पशुधनापासून विलग करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.