औरंगाबाद: मराठवाड्यात आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील लहानमोठी मिळून ६६४ पशुधनांचा पावसाने बळी घेतला आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत २ लाख २२ हजार हेक्टरवर शेतजमीनीचे क्षेत्र बाधित झाले आहे. याशिवाय आठवडाभरातील पावसामुळे विभागातील निम्न दुधना, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, विष्णुपूरी आणि मानार या सहा धरणांचा जलसाठा ९० टक्क्यावर पोहचला असून पाच धरणातून पाणी सोडण्यात आले.
आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने सरासरी ओलांडली आहे. पावसामुळे विभागातील जून पासून १ सप्टेंबरपर्यंत २ लाख २२ हजार ३६ हेक्टर शेतजमीनीचे क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच मराठवाड्यतील ११ मोठ्या धरणांपैकी निम्न दुधना, सिद्धेश्वर, माजलगाव, विष्णुपूरी आणि मनार या पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. येलदरी धरण ९५.९० टक्के भरले असून त्यातून केंव्हाही पाणी सोडले जाऊ शकते. शिवाय ५० पेक्षा जास्त मध्यम आणि लघु प्रकल्पांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेला आहे, त्यामुळे लहानमोठ्या नद्यांना पूर आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जीवितहानी-
मराठवाड्यात गेल्या सहा दिवसात १२ व्यक्तींचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. यात बीड जिल्ह्यात ४, नांदेडमध्ये ३ , औरंगाबादमध्ये २ तर हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा १२ जणांचे मृत्यू झाले आहेत. मराठवाड्यात बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या अशा लहान - मोठ्या ६६४ पशूधनाचा तर ५९८ कोंबड्यांचा पावसाने बळी घेतला आहे तर ४१ घरांची पडझड झाली आहे.
विष्णुपूरीतून १ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग-
मराठवाड्यातील विष्णुपूरीतून १ लाख ४ हजार २५० क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर निम्न दुधना धरणातून ८ हजार क्युसेक, सिद्धेश्वर १४५६ क्युसेक, माजलगाव ५९३७ क्युसेक आणि मानार १७४७ क्युसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जूनपासून एक सप्टेंबरपर्यंत शेतीचे बाधित क्षेत्र (हेक्टर)-
० बीड - ९७ हजार ९७१
० नांदेड - ५० हजार ८३०
० औरंगाबाद - ४० हजार ३३१
० परभणी - १८ हजार ९०३
० जालना - ११ हजार ४९४
० हिंगोली - २ हजार १९
० उस्मानाबाद - २८६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.