हिंगोली : वंचित व दुर्बल घटकातील बालकांनाही खासगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेता यावा, यासाठी आरटीईअंतर्गत निवडलेल्या शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ७५ शाळांची निवड करण्यात आली आहे. यात ५३९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड असते. या मुलांनाही खासगी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शासनाने आरटीईअंतर्गत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आरटीईअंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो.
त्यानुसार शैक्षणिक वर्षे २०२३-२४ साठी २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सध्या शाळांची निवड करण्यात येत असून, आतापर्यंत ७५ खासगी शाळांची निवड करण्यात आली आहे. आणखी काही शाळा वाढणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आरटीईअंतर्गत निवड झालेल्या खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. गतवर्षी ७२ शाळांमध्ये ५६४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी १८०५ बालकांचे अर्ज आले होते तर ५५६ जणांची निवड झाली होती.
मात्र, मुदतवाढ देऊनही ३८१ बालकांनीच प्रवेश निश्चित केला होता. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ शाळांची निवड झाली असून, यात ५३९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. अनेक पालक मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करतात. मात्र, आवडीनुसार शाळा मिळाली नाही तर प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष करतात. गतवर्षी निवड होऊनही अनेक पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली होती.
अशी आहे प्रवेश प्रक्रिया
सर्वात आधी परिसरातील शाळेची माहिती घ्या की कोणत्या शाळा आरटीई अंतर्गत येतात. जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब आहेत तर जवळच्या खासगी शाळेविषयी माहिती घ्या व जाणून घ्या की, तेथे आरटीई अंतर्गत राखीव कोटा आहे की नाही.
तुमच्या परिसरात आरटीई अंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीई अर्ज घ्या. एका मुलासाठी एकाच शाळेत आरटीई फॉर्म भरू शकतात. तुम्हा ऑनलाइनही फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या. त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्रे जोडून शाळेत जमा करा.
प्रवेश अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे
प्रवेशयोग्य मुलाच्या आई-वडिलांची सरकारी आयडी.
मुलाचे आयडी कार्ड
पालकांनी मुलाचे कोणतेही सरकारी कागदपत्र सादर करावे.
जात प्रमाणपत्र.
पालकांच्या उत्पन्नाचा दाखला.
बेघर मुलं किंवा प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र.
मुलाचा पासपोर्ट साइज फोटो.
जर बालक अनाथ असेल तर माता-पिता दोघांचे मृत्यू प्रमाणपत्र.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.