Hingoli : दसरा महोत्सवाची द्विशताब्दीकडे वाटचाल

कोरोनाचे दोन वर्षे वगळता आजतागायत परंपरा सुरू
Hingoli
Hingolisakal
Updated on

हिंगोली : हिंगोलीच्या दसरा महोत्सवाची द्विशताब्दीकडे वाटचाल सुरू असून, यावर्षी १६८ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. दक्षिण भारतातील म्हैसूर नंतर हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध आहे. १८८५ मध्ये येथील कयाधू नदीच्या काठावर असलेल्या खाकीबाबा मठात संत मानदासबाबा यांच्या पुढाकाराने दसरा सुरू झाला होता. त्यानंतर बद्रीनारायण मंदिर व नंतर रामलीला मैदानात दसरा सुरू झाला. कोरोना काळाचे दोन वर्षे वगळता आजतागायत येथे दसऱ्याची परंपरा सुरू आहे.

स्थानिक कलावंत व भजनी मंडळाच्या पुढाकाराने रामचरित्र मानसचे वाचन व राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषेने रामलीला सादर करुन रावण व मेघनाथ यांचे पुतळे दहन करण्यास सुरवात झाली. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे लहान- मोठे व्यावसायिक यांनी येथे स्टॉल लावण्यास सुरुवात केली. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू झाले. तत्कालीन निजाम शासनाने दसरा महोत्सवासाठी राखीव जागा म्हणून नोंद केली आहे.

१९५० च्या सुमारास व्यापारी, नागरिकांनी दसरा महोत्सव समितीची स्थापना केली. १९५५ व्या वर्षात दसरा सणाच्या शताब्दी वर्षात रामलीला मैदानावर दसरा स्तंभ उभारला. घनश्यामदास काबरा, नागनाथ आप्पा सराफ, बंसीलाल दायमा, बापूराव बांगर, हनुमानप्रसाद शर्मा, जियालाल भट्ट, राजाराम साहु, हरिश्वर धनमने, बापूराव होकर्णे, बंसीलाल साहु, नानासाहेब गोगटे, सत्यनारायण सारडा, द्वारकादास चौधरी, श्रीराम गुरु, भिकुलाल भारुका, रामेश्वर मुंदडा, मोहनलाल कयाल, ग्यानीराम सारस्वत आदींनी प्रत्येक वर्षी दसरा महोत्सव समिती निवडण्याची परंपरा सुरू केली.

१९८८ पासून दसरा महोत्सव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यासाठी विश्वस्त समितीची स्थापना करण्यात आली. यात विविध समित्या स्थापन करुन सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली.

असे पडले दसरा नाव

परराज्यातील रामलीला मंडळाद्वारे दहा दिवस रामलीला कार्यक्रम व हनुमान मूर्ती, हत्ती- घोडे यांची शहरातून मिरवणूक रावण व मेघनाथाच्या पुतळ्याचे दहन कार्यक्रम घेऊन रामलीला मैदानावर जत्रा भरु लागली, यालाच दसरा असे नाव पडले. दहा दिवस रामलीला पाहण्यासाठी येथे गर्दी सुरू झाली. १९६४ मध्ये औद्योगिक प्रदर्शन सुरू झाले अन् हिंगोलीचा दसरा देशपातळीवर प्रसिद्ध झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.