Hingoli : शेतकऱ्यांच्या क्रांतीसाठी प्रयत्नशील ; कृषीमंत्री अब्दुल सत्तार

रामलीला मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
 Minister Abdul Sattar
Minister Abdul Sattarsakal
Updated on

हिंगोली : शेतकऱ्यांची क्रांती घडविण्यासाठी शासनाच्या तिजोरीतील जास्तीत- जास्त वाटा शेतीला उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जिल्ह्याचा सिंचन अनुशेष व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्तपदे भरण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे मत कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरातील रामलीला मैदानावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्‍घाटन शनिवारी (ता. २५) झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार हेमंत पाटील होते. व्यासपीठावर माजी खासदार ॲड. शिवाजी माने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, शिवशंकर चलवदे आदींची उपस्थिती होती.

कृषीमंत्री अब्दुल सतार म्हणाले की, ‘‘जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी खासदार शिवाजी माने यांनी मांडलेला प्रस्ताव सोडविण्याची काळजी घेणार आहे. येलदरी धरणाचा कालवा जिल्ह्यात कयाधू नदी पर्यंत

आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात शेतकरी सन्मान योजना सुरु झाली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच अतिवृष्टीचे नुकसान देखील शेतकऱ्यांना मिळत आहे. जिल्ह्यात नुकतीच गारपीट झाली, त्याचे देखील अनुदान लवकर दिले जाणार आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील पारडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बारा हजार कोटींचे वाटप

राज्यात गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बारा हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची ८० टक्के रिक्त पदे सहा महिन्यांत भरली जाणार असल्याचेही सत्तार म्हणाले. राज्यात आता नानाजी देशमुख नावाने पोखरा-2 ही दहा हजार कोटी रुपयांची योजना शेतकऱ्यांसाठी लवकरच सुरू होणार असल्याचे श्री. सत्तार यांनी सांगितले.

अनेकांचा झाला गौरव

तत्पूर्वी महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वंदना सोवितकर यांना २०१३-१४ चा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २०१४-१५ सुशीला पाईकराव तर २०१६- १७ चा सुनीता मुळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथील शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील आठ शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. विजय ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()