हिंगोली : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर हिंगोली जिल्हा परिषदही महाविकास आघाडीने ताब्यात घेतली आहे. गुरुवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या विशेष सभेत अध्यक्षपदी शिवसेनेचे गणाजी बेले, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनिष आखरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हिंगोली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने दुसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता निवड प्रक्रियेस सुरवात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार उपस्थित होते. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे पेडगाव गटाचे सदस्य गणाजी बेले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने शिवसेनेचे गणाजी बेले यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी जगदीश मिनियार यांनी जाहीर केले.
हेही वाचा... या जिल्ह्यात ग्लॅन्डर्ससदृष्य आजाराचा शिरकाव
उपाध्यक्षपदी मनिष आखरे बिनविरोध
त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उपाध्यक्ष पदासाठी यशोदा दराडे व मनिष आखरे यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, ऐनवेळी यशोदा दराडे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनिष आखरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचीही बिनवरोध निवड झाल्याचे श्री. मिनियार यांनी जाहीर केले. निवड प्रक्रिया संपताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत एकच जल्लोष केला, तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. निवड प्रकियेस उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुन्हा महाविकास आघाडी पॅटर्न
दरम्यान, येथील जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी स्थापन करून सत्ता स्थापन केली होती. यात अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल पतंगे यांची निवड झाली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने हिंगोली जिल्हा परिषदेमध्येदेखील भाजपला बाजूला सारत पुन्हा महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात आला.
हेही वाचा...‘एमआयडीसी’तील कारखान्यावर छापा
शिवसेनेचे १५ सदस्य
हिंगोली जिल्हा परिषदेत ५२ सदस्य संख्याबळ आहे. यात शिवसेनेचे १५, काँग्रेस ११, राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजप ११, अपक्ष तीन, असे पक्षीय संख्याबळ आहे. मात्र, तिसरे अपत्य झाल्याने काँग्रेसच्या एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे आता ५१ सदस्य संख्या आहे.
शिवसेनेचे गणाजी बेले यांनी मारली बाजी
दरम्यान, जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी सुटले होते. यात शिवसेनेच गणाजी बेले यांचे नाव पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र, अध्यक्षपदासाठी डिग्रस कऱ्हाळे गटातून निवडून आलेले बाजीराव जुमडे (काँग्रेस), नांदापूर गटाचे रामराव वाघडव्ह (राष्ट्रवादी काँग्रेस) व पोतरा गटाचे डॉ. सतीश पाचपुते (काँग्रेस) हे सदस्य इच्छुक होते. यापूर्वी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यामुळे महाविकास आघाडीत या वेळेस काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळेल, अशी चर्चा रंग होती. त्यानुषंगाने गुप्त बैठकाही झाल्या. मात्र, ऐनवेळी शिवसेनेचे गणाजी बेले यांनी बाजी मारली.
|