होमगार्डसनी कर्त्तव्याप्रती निष्ठा बाळगावी

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होमगार्ड पार पाडत असतात. पोलीस घटक बंदोबस्तामुळे दीर्घकालीन कर्तव्य बजावण्याची संधी सर्वांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे होमगार्ड यांनी सचोटी व इमानदारीने कर्तव्य पार पाडताना निष्ठा बाळगावी असे आवाहन होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी येथे बोलताना केले.

जिल्ह्यातील सर्व महिला व पुरूष होमगार्ड यांचे दुसरे त्रैमासिक संमेलन पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पार पडले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रशासिक अधिकारी भगवान शेट्टे, केंद्र नायक अरूण परिहार, प्र. पलटन नायक नानासाहेब मोखडे, मुख्य लिपिक वैशाली डवरे- अलोने यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र होमगार्डला गौरवशाली परंपरा

दत्ताराम राठोड पुढे म्हणाले की, महाराष्ट्र होमगार्डला गौरवशाली परंपरा आहे. आपतकालीन परिस्थिती असो की कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असो. त्यावेळी पोलीस दलाला होमगार्ड यांचे मोलाचे सहकार्य लाभते. पोलिसांची अपुरी संख्या व वाढता कामाचा व्याप लक्षात घेता पोलीस घटक बंदोबस्ताला सुरूवात करण्यात आली आहे. प्रत्येक होमगार्डला 'टर्न बाय टर्न' दोन महिन्यासाठी कर्तव्यावर नियुक्त केल्या जात आहे. पोलीसांच्या सोबत कार्यालयीन कामकाजाबरोबर बंदोबस्तासाठी होमगार्ड यांना तैनात केल्या जात आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चितच आज वाढलेली आहे. याची जाणीव ठेवून सर्वांनी सचोटी, इमानदारी व निष्टेने आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

 शिस्तीचे पालन करणे बंधनकारक 

प्रत्येक होमगार्डने शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. बेशिस्त होमगार्डची अजिबात गय केल्या जाणार नाही. गैरहजर होमगार्डविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत श्री राठोड म्हणाले की, होमगार्डच्या अडी - अडचणी असतील तर त्या कार्यालय स्तरावर मांडाव्यात त्या निश्चितपणे सोडविल्या जातील. पण त्यासाठी इतर गैरमार्गाचा अवलंब अजिबात करु नका. कार्यालयीन स्तरावर अडी अडचणी सोडविल्या जात नसतील तर थेट माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन त्यांनी केले. 
निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य असलेल्या होमगार्ड संघटनेत आपले वर्तन समाजासमोर आदर्श ठरले पाहिजे. याची काळजी प्रत्येकांनी घेतली पाहिजे. आपला गणवेष निटनेटका, स्वच्छ व टापटीप असला पाहिजे. गणवेषातून स्वतः चे व्यक्तिमत्व अधोरेखित होत असते. 'स्मार्ट गणवेष आणि स्मार्ट वर्क' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन दत्ताराम राठोड यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.

समस्यांचे निराकरण करणार

माजी प्रभारी समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, माजी समादेशक अधिकारी राजु श्रीरामवार (भोकर), माजी समादेशक अधिकारी बालाजी डफडे (कंधार) यांच्यासह अनेक महिला व पुरूष होमगार्ड यांनी होमगार्ड यांचे प्रश्न व अडी अडचणी मांडल्या. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी त्या आत्मीयतेने ऐकून सर्वांचे शंकासमाधान केले. प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासन व प्रशिक्षण विभागाच्या सर्व संबंधितांना सुचना केल्या व तात्काळ तोंडी आदेश दिले.        
प्रारंभी प्रशासकीय अधिकारी भगवान शेट्टे, केंद्र नायक अरूण परिहार व प्र. पलटन नायक नानासाहेब मोखडे यांनी जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांचा सत्कार केला. संमेलनाचे प्रास्ताविक केंद्र नायक अरूण परिहार यांनी केले तर प्र. पलटन नायक नानासाहेब मोखडे यांनी आभार व्यक्त केले. 

अनेकांची उपस्थिती

या संमेलनात आर. बी. क्षीरसागर, सुलतान बेग, सरदार बलबिरसिंघ, रवि जेंकूट, बळवंत अटकोरे, बी.जी. शेख, गुंडेराव खेडकर, भीमराव जोंधळे, राजकुमार कदम, सय्यद अनवरोद्दीन, देविदास सावळे, दीपक काकडे, कैलास पाटील, विश्वनाथ काळे, अशोक पैलावार, गणेश गिरबिडे, शिवाजी पवार किशन इंगळे या माजी मानसेवी अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील जवळपास चारशे महिला व पुरूष होमगार्ड सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.