मानवत (जि.परभणी) : उक्कलगाव (ता. मानवत) येथे गुरुवारी (ता. ३०) झालेल्या महिलेच्या खूनप्रकरणाचा काही तासांतच उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीच्या खुनातून बचाव करण्यासाठी तक्रार देण्याची बनवाबनवी केल्याची कबुली पतीने दिली. या प्रकरणी आरोपी तुकाराम बाबूराव पिंपळे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
उक्कलगाव येथील अशामती तुकाराम पिंपळे (वय २५) या गुरुवारी (ता. ३०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या उक्कलगाव शिवारातील शेतात उसाचे दारे धरण्यासाठी गेला असताना आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची तक्रार मृताचा पती तुकाराम बाबूराव पिंपळे याने गुरुवारी (ता. ३०) पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी महिलेच्या खून झालेल्या शेतात जावून तपास सुरू केला होता. चौकशी करत असताना पोलिसांना मृत महिलेच्या पतीचे वर्तन संशयास्पद वाटले. पोलिसांनी मृत अशामती पिंपळेच्या पतीकडे घराची चावी मागितली. परंतु, त्याने माझ्याकडे चावी नसल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. यासोबतच मृताच्या पतीने केलेली आंघोळ, अंगात नवी कोरी घातलेली बनियान यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला.
खून केल्याची कबुली
पोलिसांनी आपले खरे रूप दाखवताच तुकाराम पिंपळे याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. गुरुवारी (ता. ३०) पत्नी शेतात काम करीत असताना कोयत्याने मानेवर व शरीरावर वार करून हत्या केली व मानवत पोलिस ठाण्यात जावून तक्रार दाखल करण्याची बनवाबनवी केल्याची कबुली आरोपी तुकाराम बाबूराव पिंपळे याने दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार, सहायक पोलिस निरीक्षक ताठे, शेख गौस, पोलिस शिपाइ दीपक वाव्हळे, हनुमान पावडे, मगर आदींनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.