औरंगाबाद : ‘‘स्पर्धा परीक्षांची (UPSC) तयारी करताना कधीच ग्लॅमरकडे पाहून या क्षेत्रात येऊ नये. इकडे येण्यासाठी मोटिवेशन आतून आले पाहिजे. असे असेल तरच युपीएससीकडे (UPSC) वळावे,’’ अशी अपेक्षा युपीएससी (UPSC) परीक्षेत ४५३ वी रँक मिळवलेल्या औरंगाबादकर शुभम नागरगोजे (Shubham Nagargoje) यांनी ‘सकाळ’ (Sakal) कडे व्यक्त केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) जानेवारी २०२१ मध्ये लेखी परीक्षा तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुलाखती झाल्या होत्या. या परीक्षेचा शुक्रवारी (ता. २४) निकाल लागला. यात औरंगाबादच्या शुभम नागरगोजे यांनी ४५३ वी रँक मिळवली आहे. शुभम यांनी शालेय शिक्षण सेंट लॉरेन्स तर, देवगिरी महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून शुभम यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी युपीएससीतून नागरी सेवेत जाण्याची तयारी केली होती.
आयएएस बनण्याचे स्वप्न..
इंजिनिअरींगनंतर दिल्लीला एक वर्ष फाऊंडेशन कोर्स केला. त्यानंतर दोन वर्ष बेंगलोरला मित्रांसोबत अभ्यास केला. शुभम म्हणाले, ‘‘क्लासेस करूनही दोनदा पुर्व परीक्षेत यश आले नाही. त्यानंतर सेल्फ स्टडीवर भर दिला. तिसऱ्या प्रयत्नात पुर्व, मुख्य आणि मुलाखतीत यशस्वी ठरलो. हे यश मिळण्याच्या १५ दिवस आधीच आरबीआयची मॅनेजरची पोस्टही मिळाली आहे. युपीएससीतील यशाने आनंद झाला आहेच. मात्र, आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) मध्ये जाण्याचे माझे स्वप्न आहे.’’
म्हणून बेंगलोरची निवड..
युपीएससीच्या तयारीला अनेकजण पुणे किंवा थेट दिल्लीला पसंती देतात. पण शुभम यांनी बेंगलोरची निवड केली. ‘‘फ्रेंड सर्कलमुळे बेंगलोरची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. सोबत चांगले लोक असतील तर यशाचे मार्ग सुखकर होतात. कोरोनामुळे मे २०२० मध्ये बेंगलोर सोडावे लागले होते. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत औरंगाबादेतच अभ्यास केला. कधी घरी, कधी मित्रांच्या फ्लॅटवर अभ्यास केला. त्यानंतर पुन्हा बेंगलोर गाठले. आणि अभ्यास सुरु ठेवला.’’
अशीय कौटूंबिक पार्श्वभूमी..
शुभम हे २६ वर्षाचे असून ते मुळचे वारणी (ता. शिरुरकासार, जि. बीड) येथील आहेत. वडीलांच्या नोकरीमुळे जन्म सिल्लोडचा. तिथेच बालपण गेले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून औरंगाबादेत स्थायिक आहेत. बीड बायपास परिसरात श्रीकृष्णनगर येथे त्यांचे वास्तव्य आहे. सध्या आई उषा घुले-नागरगोजे या सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता असून वडील भाऊसाहेब नागरगोजे हे जिल्हा परिषदेत गेवराईला शाखा अभियंता आहेत. तर मोठी बहीण प्रियांका ढाकणे-नागरगोजे या औरंगाबादच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रोफेसर आहेत. ‘‘एनजीओत काम करायला आवडते, त्यामुळे पुण्याच्या मैत्री ग्रुपशी जोडलो होतो. तसेच एकटे, मित्रांसोबत आणि कुटूंबासोबत फिरायला आवडते.’’ अभ्यासादरम्यानही यात खंड पडला नसल्याचे शुभम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.