Aurangabad news
Aurangabad news

इथे प्या, एक रुपयात एक घोट चहा : Video

Published on

औरंगाबाद : चहाचं नुसतं नाव जरी काढलं, तरी तरतरी येते. शीणही जातो, असा अनेकांचा अनुभव आहे. चहा हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. चहा पाजण्यावरुनच पाहुणे मंडळी माणुसकी ठरवतात. पाच रुपयांचा चहा एखादे लाखमोलाचे कामही सहज करुन देतो. त्यामुळे चहाच्या घोटाला नाही म्हणू नये, असं जुने लोक सांगतात. असं हे चहाचं महात्म्य सांगायचं कारण म्हणजे, औरंगाबादेत मिळतोय चक्क एका रुपयात एक घोट चहा... 

15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. तुमचं अन्‌ चहाचं नातं काय, असं कुणाला विचारलं, तर एखाद्या प्रेमवीराचं प्रेयसीशी जे नातं तेच चहासोबतचं नातं म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. जगातील असंख्यजनांची नेहमीची सकाळ चहानेच होते. आज चहादिनी कित्येक चहाप्रेमींनी चहाचं स्टेटस ठेवलं, चहा पितानाचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. 

याच आंतराष्ट्रीय चहा दिवसाच्या निमित्तानं आम्ही औरंगाबादच्या सिडको बसस्थानकाबाहेरील एका चहा स्टॉलला भेट दिली. तिथं गुळाचा चहा मिळतो. आम्ही स्टॉलचालकाशी गप्पा मारल्या, तेव्हा त्यांनी जी गोष्ट सांगितली, ती वाचून तुम्हीही अवाक्‌ व्हाल. याच स्टॉलवर घोटभर चहा पिण्यासाठी लोक आपली कामं सोडून, वेळात वेळ काढून येतात. 

स्वप्नातही चहाच... 

या स्टॉलचे चालक प्रकाश खोतकर म्हणतात, "चहाचे स्टॉल मांडून दोन ते तीन वर्षे झाली. पूर्वीच्या काळी लोक गुळाचाच चहा पीत. नवीन पिढीतील लोकांना गुळाचा चहा काय कदाचित हेही माहीत नसेल. म्हणून मी गुळाचा चहा बनवून विकण्याचा निर्णय घेतला. स्टॉल चांगला चालतो. लोकांनाही हा चहा खूप आवडतो. मधुमेह असणाऱ्यांनाही गुळाचा चहा चालतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहाभोवतीच सगळं विश्‍व फिरतं. त्यामुळे स्वप्नातही चहाच बघतो, अन... कोणत्याही कामात चहाच दिसतो.'' 

जाणूया चहाचा इतिहास 

सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये चहा पिला जात होता, असं बोललं जातं. सात बहिणी अर्थात ईशान्य भारत, म्यानमारचा काही भूभाग, नैऋत्य चीन व तिबेट या प्रदेशात चहाची उत्पत्ती झाली, असं मानलं जातं. पुढं चीन, जपान, भारत, बांगला देश, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान अशा विविध देशांत चहाची लागवड सुरू झाली. भारतात अठराव्या शतकापासून चहाच्या झाडांची लागवड केली जाते. इंग्रजांनी भारतात चहा आणला असं अनेकांचं मत आहे; मात्र फारतर इंग्रजांनी चहा पिण्याची सवय लावली, असं म्हणणं अधिक योग्य राहील. 

हे आहेत चहाचे प्रकार 

चहाच्या वनस्पतीच्या प्रक्रिया केलेल्या पानांपासून 'पत्ती' तयार होते. चहाची पाने हाताने खुडतात. पानांवर प्रक्रिया करुन चहाचे ब्लॅक टी, उलॉंग टी, ग्रीन टी व व्हाईट टी असे प्रकार पाडले जातात. भारतात जास्त ब्लॅक टी पिला जातो. आफ्रिकेतील देशांत ग्रीन टी सेवन करतात. जगभर चहा निर्यात करणाऱ्या देशांत चीन पहिल्या क्रमांकावर असून, भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चहाच्या निर्यातीमुळे भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळते. 

कोणता चहा जगभर पितात.. 

व्हाईट चहाची कोवळी पाने खुडून, सुकवून व्हाईट टी तयार करतात. पानांच्या आकारानुसार चहाचे वर्गीकरण झाले असून, प्रदेशानुसार नावेही पडली आहेत. उदा. मोठी पाने आसाम चहा, लहान पाने चिनी चहा, मध्यम आकाराची पाने कंबोडिया चहा. जगभर चीनमधील लहान पानांचा चहा व आसाममधील मोठ्या पानांच्या चहापासून मिळविलेली भुकटी अर्थात पत्तीचा वापर सर्वाधिक केला जातो. 

असा हा चहा.. 

आदरातिथ्य म्हणजे चहा... असंच चहाचं समीकरण अनेकजण मानतात. जगातील सर्वांत लोकप्रिय पेय म्हणून चहालाच मान आहे. चहाने थकवा कमी होतो, तो घालविण्यासाठी लोक आवर्जून चहा पितात. चहात कॅफीन, कॅटेचीन आणि थिएनीन ही रसायनं असतात. भारतात चहा प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनला आहे. चहा बनविण्यात थोडीही कसर राहिली, तर चहा बनविणाऱ्यांची खैर होत नाही. असं आहे चहाशी पिणाऱ्यांचं नातं. 

पण काय आहे, एका घोटाची भानगड...

हा चहा गुळापासून बनविला जातो. गूळ साखरेपेक्षाही महाग आहे. शिवाय अलीकडेच दुधाच्या किमतीत लिटरमागे दोन रुपयांनी भाववाढ झाली आहे. परिणामी, चहाचा निर्मिती खर्च वाढला आहे. त्यामुळे एक कट चहाची किंमत वाढविण्याऐवजी ज्या ग्लासामध्ये ग्राहकाला चहा दिला जातो, ते ग्लासच पाच घोटांच्या आकाराचे ठेवले जातात. त्यामुळे पाच रुपये किंमतीच्या चहाच्या कटमध्ये मोजून पाच घोटच चहा मावतो.

हेही वाचा -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.