Beed News : रिक्त पदांमुळे ‘डागाळलेल्यां’चेही ‘लाड’

‘जलजीवन’मध्ये अनियमिततेचा ठपका असताना पदाची लॉटरी
jal jeevan mission scheme vacant post in beed zilla parishad
jal jeevan mission scheme vacant post in beed zilla parishadSakal
Updated on

बीड : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. अगोदरच रिक्त पदांमुळे मरणकळा आलेल्या या विभागावर आता जलजीवन या केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनांचा भार असताना ९० पैकी तब्बल ७५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘डाग’ असलेल्यांचाही ‘लाड’ पुरवण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.

ज्या अधिकाऱ्यावर जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीत अनियमिततेचा ठपका ठेवलेला आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाईऐवजी या रिक्त पदांच्या कसरतीमुळे कार्यकारी अभियंताचा मुकुट चढला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर १,३६५ गावांतील पाणी योजनांच्या अंमलबजावणीचा भार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारची महत्वकांक्षी जलजीवन मिशन योजना देखील याच विभागामार्फत राबविली जात आहे.

जिल्ह्यात तब्बल १,२२५ पाणी योजना हाती घेतल्या आहेत. मात्र, ज्या विभागावर या महत्वकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, त्या विभागातील कुशल पदे भरण्याकडे शासनाने पूर्णपणे काणाडोळा केला. यामुळे योजनेचे तांत्रिक काम कसे पूर्ण होणार, याचाही विचार शासनाने केला नाही. परंतु, रिक्त पदांमुळे काही ठराविक अधिकाऱ्यांची चांगलीच चांदी होत असल्याचे दिसते.

जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. मर्जीतल्या ठेकेदारांना ठेके देणे, ठेके देताना नियमांचे उल्लंघन, निविदा पद्धती राबविताना अनियमितता, अशा तक्रारी विभागीय आयुक्तांपर्यंत गेल्याने अंबाजोगाईच्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या अनियमिततेच्या तक्रारींची चौकशी केली.

यात अनियमिततेप्रकरणी ठपके असलेल्यांमध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अभियांत्रिकी कार्यालयात उपअभियंता असलेल्या एम. आर. लाड यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे.

मात्र, त्यांच्यावर काही कारवाई होण्याऐवजी आता त्यांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचीच लॉटरी लागली आहे. या खुर्चीच्या माध्यमातून आगामी काळात तब्बल ८५० कोटी रुपयांची जलजीवन योजनेच्या कामांची देयके अदा केली जाणार आहेत. अधिकारी नसल्याने काही अधिकाऱ्यांची बड्या खुर्च्यांवर बसण्याची हौस पूर्ण होत आहे.

पदांचे अभियंते द्यावेत, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांनाच रिक्त पदांचा पदभार देण्याशिवाय पर्याय नाही. पदभरतीबाबत पाठपुरावा सुरु आहे.

- अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

अभियंत्यांची रिक्त पदे

संवर्ग -मंजूर पदे- भरलेली पदे- रिक्त पदे

कनिष्ठ अभियंता -७६ -०६ -६९

उपविभागीय अभियंता -११ -०३ -०८

कार्यकारी अभियंता- ०२- ०० -०२

उपकार्यकारी अभियंता -०१ -००- ०१

एकूण- ९० -१५ -७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.