Jalana : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देणार तातडीने मदत पालकमंत्री अतुल सावे यांचे आश्‍वासन

शेतशिवारातील पिकांची पाहणी
Jalana
Jalana sakal
Updated on

जालना : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत केली जाईल, असे आश्‍वासन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

पालकमंत्री अतुल सावे यांनी अंबड व बदनापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. यामध्ये बदनापूर तालुक्यातील बावणेपांगरी, अंबड तालुक्यात हस्तपोखरी, सारंगपूर, सुखापुरी या गावांना भेट दिली. अंबड, बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या अनेक भागात चिखल आहे. त्यामुळे पालकमंत्री सावे यांनी बैलगाडीतून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी बैलगाडीला काही प्रमाणात सजविण्यात आले होते.

या प्रसंगी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, बदनापूरचे तहसीलदार श्री.मुनलोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी शीतल महाजन आदींसह तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

तात्काळ पंचनाम्याच्या प्रशासनास सूचना

अंबड : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.नुकसानग्रस्त शेतशिवाराला भेट दिल्यानंतर येथील तहसील कार्यालयात पालकमंत्री सावे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की अंबड व बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील पंधरा दिवसांमध्ये अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.

पुढील दोन दिवसांमध्ये नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारकडून आवश्यक ती आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाईल, असे श्री.सावे यांनी स्पष्ट केले.

आमदार कुचे यांनी अंबड तालुक्यातील ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त झालेले असल्यामुळे पावसाचे प्रमाण मोजता येत नाही. शेतकऱ्यांना निकषात बसवण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे तातडीने पर्जन्यमापक यंत्रे बसून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहायक गटविकास अधिकारी ए.ए.चव्हाण, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, विस्तार अधिकारी व्ही.बी.बनाटे आदी उपस्थित होते.

तर तो शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र

शासन निर्णयानुसार सन २०१७ ते २०२० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ५० हजार रुपयापर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांना आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे.

त्यामुळे यादीमध्ये नाव असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राशी यादीतील विशिष्ट क्रमांक,आधार कार्ड, व बचतखाते पासबुकसह संपर्क साधून तातडीने आधार प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.