कुंभार पिंपळगाव : शहरासह ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे सेल,ऑनलाइन खरेदी यामुळे आता स्वस्तात कपडे मिळू लागले आहेत. त्यामुळे कपडे जुने झाले की अडगळीत पडत आहेत. विशेष म्हणजे जुन्या कपड्यांना रफू, ठिगळ लावणे, अल्टर करणे आता कालबाह्य झाले आहे.
पूर्वी ग्रामीण भागात वर्षात दिवाळी किंवा पोळा सणाला, घरच्या लग्न सोहळ्याला नवीन कपडे शिवले जायचे. कापड कसेही निघू वर्षभर वापरावेच लागायचे. कपडे फाटले की त्याला रफू करणे, ठिगळ लावणे, मोठे कपडे छोट्यांसाठी अल्टर केले जात असत. आता काळ बदलत गेला आहे. फाटलेले कपडे शिवून घालणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. आता नव्या काळात या गोष्टींकडे लक्ष द्यायला शिवणकाम कारागिरालाही वेळच नाही. कपडे जुने झाले की बाजूला पडत आहेत. त्यातच जुने कपडे आणि साड्यांच्या बदल्यात भांडी, साहित्यही घेतले जात आहे.
पूर्वीच्या काळी फाटलेले कपडे घरी सुईदोऱ्याने शिवल्या जायचे. त्यानंतर शिलाई मशीनवर शिवून मिळू लागले. हळूहळू काळ बदलत गेला घरातला सुई-दोरा गेला आणि शिवायलाही वेळ नाही अशी परिस्थिती झाली. वर्षातून एकदा मिळणारे कपडे आता कधीही मिळू लागले आहेत. विविध सेल,ऑनलाइन खरेदी यामुळे कमी दरात नवीन कपडे उपलब्ध झाले आहे. पूर्वीच्या काळी कुणाचे जुने कपडे, घरातल्या ज्येष्ठांचे कपडे मुलांसाठी लहान करून वापरल्या जायचे. आता जुने कपडे गाठोडे बांधून गावाबाहेर फेकले जाते किंवा सरळ जाळून टाकले जातात.
अनेकदा जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी, प्लॅस्टिकचे साहित्य देणारे विक्रेतेही आहेत. जुने कपडे घालणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. पूर्वी अनेक महिला दोन वेगवेगळे भाग जोडून साड्या वापरत असत. कधी लग्नाच्या आहेरात आलेल्या साड्यांचेही अप्रूप वाटायचे. आता प्रत्येकाच्या घरात साड्यांनी कपाट भरली आहेत. जुन्या साड्याही किलोवर विकू लागल्या आहेत काहीजण या साड्यांपासून सुताडे, सतरंज्या, पायपुसणे, कासरा आदी वस्तू तयार करून घेत आहेत. खेड्यापाड्यात लुगडे, नाट्यापासून उबदार गोधडी शिवल्या जाते. आजही खेड्यात गोधडी शिवणाऱ्या विविध महिला आहेत. युवक, मुलांचा नव्या रेडिमेड कपड्यांकडे ओढा आहे. मध्यमवयीन, ज्येष्ठ ग्रामस्थ मात्र शिवणकाम कारागिराकडे आवर्जून नवीन कपडे शिवून घेताना दिसतात.
जुने कपडे शिवणे, ठिगळ, रफू, अल्टर कोणी करत नाही. जुनी पिढी नवीन कपडे शिवून घेतात. नव्या पिढीचा मात्र रेडीमेड कपड्यांना पसंती असल्याने कपडे शिवण्याकडे कल दिसत नाही. जिन्स,रेडीमेड पॅन्टची उंची कमी करायची कामे तेवढी मिळतात.
- बजरंग सुत्रावेशिवणकाम कारागीर, कुंभार पिंपळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.