पारध - उन्हाळ्यात पूर्वी शाळेला सुटी लागली की दरवर्षी बच्चे कंपनीची धमाल सुरू व्हायची. सकाळी मैदानात नुसता धिंगाणा, दुपारी घरात बैठे खेळ व्हायचे, उन्ह उतरले की पुन्हा मैदानात क्रिकेट, कबड्डी, खोखो, विटीदांडूचे सामने रंगायचे. काही दिवस मामाच्या गावालाही जायचा आनंद असायचा. आता मात्र मुलांची उन्हाळी सुटी बंदिस्त झाली आहे. दिवसभर टीव्ही समोर ठाण नाहीतर मोबाईलफोनमध्ये मुले रमत असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातील आपल्या मामाच्या गावाला खास सुटी घालवण्यासाठी जात असत. सुटीचे दिवस गावाकडे खेळण्यात -बागडण्यात कसे निघून जात हे कळतही नव्हते. परंतु आता काळाच्या ओघात उन्हाळ्यात मुलांना वेगवेगळ्या शिकवण्या इतर शिबिर घेण्यात येत आहेत.
शिवाय नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासही आता सुट्यांपासूनच करून घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. परिणामी ग्रामीण भागातील चिल्ल्यापिल्ल्यांचा गोंगाटही आता कमी झालेला आहे. मामांची गावे पोरकी झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीही आता कमी झालेली आहे.
नोकरी, काही व्यवसायानिमित्त शहरात गेलेले अनेकजण खास करून उन्हाळ्यात लहान मुलांना गावाकडे पाठवत असत. आपल्या नातेवाइकांबाबत आपुलकीची जाणीव व्हावी, त्यांना नातेगोते कळावे हा उद्देश त्यामागे असे. सुटीत मुले शेतशिवारात मनसोक्तपणे फिरणे, बैल गाडीची सैर करणे, झाडांवर चढणे, चिंचा, आंबे खाणे, मोठ्यासह विहिरीत, तलावात पोहणे असा हा दिनक्रम ठरलेला असे.
आता मात्र उन्हाळी सुटीचे स्वरूप बदललेले आहे. कोणत्याच मैदानावर मुले क्रिकेट कबड्डी, खो -खो, विटी दांडू असे खेळ खेळताना दिसत नाहीत. टीव्हीसमोर बसून चित्रपट पाहणे, प्रिमिअर लीगमुळे क्रिकेटचे सामने, क्षणचित्रे पाहणे नाहीतर मोबाईलफोनवर गेम खेळणे, सोशल मीडियावर गुंतून जाणे असे प्रकार होत आहेत. मुलांचे बालपण हरवत चालले असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी मुले शाळेला सुटी लागली की मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळत असत. त्यामुळे मुलांचा व्यायाम होई, व्यक्तिमत्त्व विकास होत असे. परंतु काळाच्या ओघात ही जागा आता मोबाईल फोन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गेम, टीव्हीने घेतली आहे, यात मुले तासन्तास गुंतून पडत असल्याचे चित्र आहे.
- जगदीश लोखंडे, पालक, पारध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.