बदनापूर (जि.जालना) : औरंगाबादहून जालन्याला जाणाऱ्या साईरथ ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला शनिवारी (ता.२०) मध्यरात्री १२ वाजता अचानक आग लागली. या बसमध्ये चालक आणि क्लिनर वगळता एकही प्रवाशी नव्हता. मात्र बसला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालक आणि क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवत त्यातून उडी मारली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याने बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना जालना-औरंगाबाद महामार्गावरील वरुडी पाटी (ता. बदनापूर) जवळील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथून जालन्याला प्रवाशी घेऊन जाणारी रिकामी साईरथ ट्रॅव्हल्सची बस जालना - औरंगाबाद महामार्गावरील वरुडी शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळ पोचताच बसला अचानक आग लागली. या बसमध्ये चालक - क्लिनर वगळता एकही प्रवाशी नव्हता. बसला आग लागल्याचे चालक संजय बाबासाहेब क्षीरसागर (वय ४२ रा. सिडको एन. ६ औरंगाबाद) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मोठ्या शिताफीने बस रस्त्याच्या कडेला थांबवत क्लिनर गणेश विठ्ठल मचे यांच्यासह बसमधून उडी घेतली.
त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती खेडकर, सहायक फौजदार श्री. खंडागळे, पोलिस वाहन चालक शिवाजी भगत यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून पाण्याचे टँकर मागविले. तसेच जालन्याहून अग्निशामक दलाला पाचारण केले. या आगीच्या घटनेत पेटलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.