जालना : एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह सुरु होता, दुसरीकडे दहा दिवसापासून शहर व जिल्ह्यात कमी अधिक पावसाने चांगलेच धुमशान घातले आहे.सततच्या पावसाने कापूस पिकावर '' मर'' प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, भाजीपालासह इतर पिके पिवळी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मागील एक-दोन दिवसापासून अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. रविवारी ( ता.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. विजेचा कडकडाट आणि जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. दुपारी झालेल्या जोरदार पावसाने कारला,कडवंची,खरपुडी, नंदापूर,वखारी,नेर शिवणी, जामवाडी,दरेगाव, इंदेवाडी, पानशेंद्रा,देवमूर्ती शिवारात जोदरार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतातील पिकात पाणीच पाणी साचले असल्याचे चित्र दिसून आले. कडवंची शिवारात दुपारी झालेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले,असे शेतकरी चंद्रकांत क्षीरसागर यांनी सांगितले.
आमच्याकडे सारखा पाऊस पडत आहे. रविवारी पावसाने कहर केला.जोरदार आलेल्या पावसाने शेतातील मोसंबीला आलेली फळेच गळून पडली. पावसाने आमचे मोठे नुकसान झाले असल्याचे हातवन ( ता.जालना) येथील शेतकरी सुभाष गायकवाड यांनी सांगितले. अनेक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे. आठवड्यापूर्वी पावसाचा खंड पडलेला होता, अशा भिन्न परिस्थितीत काही ठिकाणी बीटी कापूस पिकावर ‘मर’ आल्याचे चित्र दिसून येत असल्याचे कृषी विज्ञान केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शंभर लिटर पाण्यात युरिया १.५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटेश १.५ किलो अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २५० ग्रॅम घेऊन झाडाच्या बुंध्याजवळ १०० ते १५० मिलि आळवणी करावी.
दोन पायातील बोटात झाड धरून झाडाचा बुंधा शेजारील माती दाबून घ्यावी तसेच या सोबत साचलेले पाणी प्रथम शेताबाहेर काढावे, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.अशा वेळी ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची २०० मिलि प्रती दहा लिटर पाण्यातून आळवणी करण्याचे आवाहन केंद्राने केले आहे.
पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने सल्ला देताना सांगितले, की गेल्या चार वर्षांपासून वातावरण बदलाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीचे शेतीचे प्रयोगात्मक कामे केली त्यामध्ये पाणी निचरा करण्याच्या नियोजनाचाही समावेश आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतातील पाणी व्यवस्थित निचरा होते हे प्रायोगिकदृष्ट्या लक्षात आले आहे.
अशा पद्धतीचे काम करीत शेतकऱ्यांनी आपल्या नंबर बांधामध्ये किंवा दोघांच्या सामायिक बांधामध्ये एक चर काढून दोन्हीकडच्या बाजूला जर भराव टाकला तर मध्यभागी पाण तास निघते. प्रत्येक पावसातील अधिक झालेले पाणी हे पाण तासाद्वारे निचरा करता येते त्यामुळे शेतीचे नुकसान होणार नाही, अधिक पाणी थांबणार नाही जमिनीची धूप जागेवर थांबेल, पिकाची नासाडी होणार नाही.
जालन्यात पावसामुळे तारांबळ
शहरात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.दीड तास झालेल्या पावसाने रविवार भाजीबाजारात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्याची तारांबळ उडाली होती. शहरातील गांधी चमन, टाऊन हॉल, शनिमंदिर, कचेरी रोड,रेल्वे स्टेशन परिसर,मस्तगडसह अनेक सखल भागात, भर रस्त्यावर पाणीच पाणी साचले असल्याचे चित्र दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.