जालना : प्रत्येक शाळेची संच मान्यता ही विद्यार्थी संख्येवर दिली जाते. पूर्वी वर्गातील पटसंख्या ही विद्यार्थ्यांचे डोके मोजून केली जात होती. मात्र, आता शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले नाही, तर त्या वर्गात विद्यार्थी संख्या उपलब्ध नाही,
असे गृहीत धरून वर्गाची संच मान्यता रद्द केली जाणार आहे. परिणामी शिक्षकांची पदेच अतिरिक्त होण्याची भिती आहे. त्यामुळे आधार प्रमाणित विद्यार्थ्यांचे आणि टेन्शन शिक्षकांना अशी गत झाली आहे. \
शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून ता. ३१ मार्च पूर्वी वेतन अदा करणे आवश्यक आहे. मात्र, २०२२-२३ च्या संच मान्यता या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात येत आहे. त्यामुळे आधार प्रमाणित झालेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यता देऊन त्याचा शिक्षकांचे वेतन मंजूर केले जाणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या ता.३१ तारखेला अनेक शिक्षकांचे वेतन अडकण्याच्या मार्गावर आहे.
कारण हजारो विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आधार वैध केलेले नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे या विद्यार्थ्यांचे आधार वैध प्रमाणित करण्यासाठी ता. ३० एप्रिलपर्यंत शिक्षण आयुक्तालयाने अवधी दिला असून २०२२-२०२३ ची सुधारित संच मान्यता गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये सध्या शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आधार प्रमाणित करण्याचे काम लागले आहे.
या ऑनलाइन वैध आधार प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, जन्मतारखेमध्ये बदल असल्यास ते आधार वैध नोंदणीस अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधारवरील नाव, जन्म तारीख दुरुस्ती करून शिक्षकांना हे ऑनलाइन नोंद करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हजेरी पटावर विद्यार्थी संख्या अधिक असली आणि आधार वैध प्रमाणित कमी असेल तर त्या वर्गाची संच मान्यताच रद्द होणार आहे.
संच मान्यता रद्द झाल्यास पुन्हा अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय शिक्षकांच्या वेतनाला ही टाच बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक संस्था चालकांकडून ही ऑनलाइन प्रक्रिया थांबवण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीला शिक्षक विभाग आणि शिक्षणमंत्री कितपत प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे.
पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याच्या सूचना वरिष्ठस्तरावरून आल्या असून त्या सर्व शाळांना दिल्या आहेत. शाळास्तरावर आधार वैध करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संच मान्यता असणार आहे. जर विद्यार्थ्यांचे आधार वैध झाले नाही, तर संच मान्यता रद्द होण्यासह अतिरिक्त शिक्षक ठरू शकतात.
— कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, जालना
ऑनलाइन आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संच मान्यता ठरविली जाणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आधार वैध करताना शिक्षकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पूर्वी प्रमाणे विद्यार्थ्यांचे डोके मोजून संच मान्यता द्यावी. किंवा विद्यार्थ्यांचे ऑफलाईन आधार कार्ड घ्यावेत. जर आधार कार्डवर चुकीची माहिती असेल तर त्याला पालक, विद्यार्थी जबाबदार आहेत. यात शिक्षकांचा काय दोष आहे.
— कपिल आकात,सचिव, मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतूरjalna
ग्रामीण भागात मूळ दाखला व आधार कार्ड यांच्यामध्ये विसंगती येते आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कार्ड अवैध ठरत आहेत. ग्रामीण भागात नेटवर्कची फार मोठी समस्या आहे. त्यामुळे रात्र-रात्र जागून आधार कार्ड दुरुस्तीचे काम शिक्षकांना करावे लागते. विद्यार्थी संख्या कमी झाली तर पदे कमी होतील.
वेतन बंद होण्याची भिती शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी तरी ऑनलाइन संच मान्यता देण्याऐवजी ऑफलाइन पद्धतीने द्यावी. आगामी काळात आधार कार्ड अपडेट करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात यावी.
— डॉ. भारत खंदारे, प्राचार्य, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर,
अनेक विद्यार्थी यांचे आधार मिसमॅच आहेत. आधार कार्ड तयार करताना त्यांच्या नावासह इतर गोष्टीत तफावत आहे. ती चुक आमची नाही. तरी देखील आमच्यावर ती लादली जात आहे. शाळास्तरावर शिक्षण विभागाकडून डोके मोजणी केली जाते. ती गृहीत धरून संच मान्यता देण्यात यावी.
— बाबासाहेब ताठे, मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद विद्यालय, मंठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.