बीड : तीन पिढ्यांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक अशी क्षीरसागर- पंडित यांची जिल्ह्यात ओळख आहे. एकाच पक्षात राहून दोघांनी एकमेकांचे पराभव घडवून आणलेले आहेत. मात्र, शहरातील जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेने दोघे एकत्र आले आणि संवाद झाला. तब्बल नऊ वर्षांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा पंडितांच्या शिवछत्रचा उंबरठा ओलांडला.
दिवंगत केशरबाई क्षीरसागर व ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव पंडित समकालीन राजकारणी. दोघेही एकाच पक्षात असतानाही त्यांच्यात विळ्या- भोपळ्याचे सख्य असे. शिवाजीराव पंडित यांचा पुतणे बदामराव पंडित यांच्या हाताने पराभव घडविण्यात क्षीरसागरांनी सर्व शक्ती पणाला लावली.
याचे उट्टे काढण्यासाठी दिवंगत केशरबाई क्षीरसागरांचा पराभव करत नाही तोपर्यंत आपणही ‘डोक्यावर टोपी’ घालणार नाही, असा पण शिवाजीराव पंडित यांनी केला. स्वत: काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपच्या तत्कालीन लोकसभेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बळ दिले आणि त्यांचा पराभव घडवूनच डोक्यावर टोपी चढविली.
दरम्यान, आताच्या पिढीतही क्षीरसागर- पंडित यांचे हे विळ्या- भोपळ्याचे सख्य सुरुच आहे. २०१२ साली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी जयदत्त क्षीरसागर पालकमंत्री असल्याने संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती.
त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते व सर्व जिल्हा परिषद सदस्य क्षीरसागरांच्या नगर रोडवरील बंगल्यात होते. मात्र, ‘बंगला आपल्यालाही आहे’ पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी ‘भवानी शप्पथ’ आपण त्यालाच मतदान टाकू, पण कोणाच्या बंगल्यात जाणार नाही, असे अमरसिंह पंडित म्हणाले होते.
मात्र, याच टर्ममध्ये २०१४ साली राष्ट्रवादीने विजयसिंह पंडित यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. भाजप- राष्ट्रवादीची मते समान होऊनही ‘लक’मुळे विजयसिंह पंडित जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. याच्या सेलीब्रेशनला क्षीरसागर पंडितांच्या शिवछत्रवर आले होते.
पुढेही या दोघांतील विस्तव जळतच आहे. पण, सोमवारी क्षीरसागरांच्या बंगल्यासह शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. हा जमाव पंडितांच्या शिवछत्रसमोरही आला होता. मात्र, तेथे अनुचित प्रकार घडला नव्हता.
परंतु, याच्या पाहणीच्या निमित्ताने जयदत्त क्षीरसागर शिवछत्रवर आले आणि त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याशी संवाद साधला. आंदोलनाआड भलतेच चेहरे असल्याचे दोघांच्या बोलण्यातून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.