Beed Crime News : जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात तीस लाखांची मागणी

बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक खाडेसह तिघांवर गुन्हा
Beed Crime News
Beed Crime NewsSakal
Updated on

बीड : शहरातील जिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात सहकार्य करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ३० लाख देण्याचे ठरले. त्यानंतर त्यातील पहिल्या हप्त्याचे पाच लाख रुपये स्वीकारताना बुधवारी (ता. १५) सायंकाळी बीडमध्ये एका खासगी व्यक्तीस अटक करण्यात आली.

या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यासह हवालदार आर.बी. जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाईनंतर खाडेच्या बीड येथील घराची झडती घेतली असता, कोट्यवधी रुपये सापडल्याची माहिती आहे. सध्या दोघेही संशयित फरार आहेत.

बीड शहरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या मल्टिस्टेट आणि पतसंस्थांमधील आर्थिक गैरव्यवहारांचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या तपासाची पद्धत वादग्रस्त ठरलेली आहे.

जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून जिजाऊ मल्टिस्टेटचा संचालक बबन शिंदे फरार आहे. या पतसंस्थेच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी हरिभाऊ खाडे याने तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाकडे १ कोटी रुपये मागितले.

परंतु, ३० लाखांमध्ये तडजोड झाली. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता बीड शहरातील प्रवीण जैन यांच्या मौजकर टेक्स्टाइल या दुकानात स्वीकारताना कुशल प्रवीण जैन याला जालना आणि बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

या प्रकरणात चौकशी केली असता कुशल जैन याने आपण ही रक्कम पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या सांगण्यावरून स्वीकारल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व कारवाईनंतर खाडे याच्या शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील बळिराजा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या घराची; तसेच गावाकडील घराचीदेखील झडती घेण्यात आली. यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याचे समजते. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नेमके प्रकरण काय?

बीडमधील जिजाऊ मल्टिस्टेटचा प्रमुख बबन शिंदे याने पांगरी रोडवर शाळा बांधली होती. त्याच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य तक्रारदाराने दिले होते. त्याचे पैसेही तक्रारदाराला शिंदे याने दिले. परंतु, ठेवीदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. त्यात बँक स्टेटमेंटमधून पैसे तक्रारदारांच्या खात्यावर गेल्याचे दिसले.

त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक खाडे याने दोघांना बोलावून घेतले. ‘तुम्हाला या गुन्ह्यात आरोपी करत नाही, त्याच्या बदल्यात प्रत्येकी ५० लाख असे १ कोटी रुपये द्या’, असे म्हणत लाचेची मागणी केली. चार महिन्यांपासून खाडे हा त्यांना त्रास देत होता. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी सापळा रचून कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.