आष्टी - तालुक्यातील खडकत येथील अवैधरित्या सुरू असलेल्या सहापैकी दोन कत्तलखान्यांना शुक्रवारी (ता. चार) सील ठोकून ताब्यात घेण्यात आले. उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली.
देशभरात गोवंश हत्याबंदी असताना तालुक्यातील खडकत येथे अवैधरित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून मांस विविध मोठ्या शहरांकडे विक्रीसाठी पाठविण्यात येत होते. सुमारे १८ अवैध कत्तलखान्यांतून हा प्रकार सुरू होता. अवैधरित्या सुरू असलेले हे कत्तलखाने पाडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर स्वामी यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पाच-सहा महिन्यांपूर्वी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात येथील १२ बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त केले होते. उर्वरित सहा कत्तलखाने तांत्रिक अडचणींमुळे तसेच होते.
या कत्तलखान्यांसंदर्भातील फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४५ प्रमाणे प्रस्तावावर पाटोदा येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ता. १३ रोजी मालमत्ता तातडीने ताब्यात घेत शासन निगरानीत घेण्याबाबतचा निर्णय दिला आहे. या अनुषंगाने येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सानप यांनी ग्रामविस्तार अधिकारी अमोल करडुळे यांना आदेशित केल्यानंतर त्यांनी सहापैकी दोन कत्तलखाने सील करून ताब्यात घेतले.
गटविकास अधिकारी यांच्या आदेशान्वये शुक्रवारी खडकत येथील सहा कत्तलखाने सील करण्याची कार्यवाही सुरू केली. सहापैकी दोन कत्तलखान्यांना सील ठोकण्यात आले असून उर्वरित चार ठिकाणी विरोध झाल्याने कारवाई तूर्तास थांबविण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- अनिल करडुळे, ग्रामविकास अधिकारी, खडकत
काय आहेत एसडीएम यांचे आदेश
खडकत येथील अजिज ईस्माईल कुरेशी व सौ. मुन्नी यांच्या मालकीची मालमत्ता क्र. ७३३ क्षेत्र १३ हजार २२५ चौरस फूट, तसेच अब्दुल मुतालिक नईम शेख यांची मालमत्ता क्रमांक ७३२ क्षेत्र २ हजार १७८ चौरस फूट, अली महेबूब कुरेशी व सौ. शायीन यांची मालमत्ता क्र. १७५, क्षेत्र ५ हजार २०० चौ. फूट, हारून सुलेमान पठाण व सौ. शकिलाबी यांची मालमत्ता क्रमांक ९५२ क्षेत्र ३ हजार ७५० चौ. फूट व इरफान मुस्ताफा कुरेशी यांच्या मालकीची मालमत्ता क्रमांक १३९-१, क्षेत्र १ हजार २६० चौ. फूट या सहा ठिकाणी सुरू असलेल्या अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांसाठी वापर होत असलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन शासन निगरानीत घेऊन अहवास सादर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सील केलेले कत्तलखाने व तांत्रिक अडचणींमुळे राहिलेले कत्तलखाने लवकरच प्रशासनाच्या मदतीने कायदेशीर मार्गाने उध्वस्त करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. प्रशासन लवकरच कायदेशीर मार्गाने योग्य ती कारवाई करून सर्व कत्तलखाने उध्वस्त करेल, असा विश्वास आहे.
- शिवशंकर स्वामी, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.