लातूर: जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पेरण्या मंद गतीने सुरू आहेत. सर्वच भागात पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात चांगला पाऊस झाल्याने पेरण्या पूर्ण झाल्या असून, काही भागात अजूनही पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. या स्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत २१ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, ही टक्केवारी पंचवीसच्या पुढे जाण्याची शक्यता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर एकसारखा पडत नसल्याने अडचण झाली आहे. काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात पावसाचा एक थेंबही नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३८ मिलिमीटर पाऊस पडला असून, गेल्यावर्षी या तारखेपर्यंत १२२ मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्यावर्षी कमी पाऊस पडूनही तो सर्वत्र एकसारखा पडल्याने पेरण्यांना वेग आला होता. यावर्षी चांगला पाऊस पडूनही पेरण्या मंद गतीने सुरू आहेत.
पेरणीयोग्य जोरदार पाऊस पडल्यानंतरच पेरण्या करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहे. दुबार पेरण्यांचे संकट टाळण्यासाठी शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. मात्र, पाऊस सातत्याने शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. काही भागात सतत पाऊस पडत असून, काही भागात हलका पाऊस पडत आहे. चांगला पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग देत त्या पूर्ण केल्या आहेत. काही भागात चांगला पाऊस पडून पुन्हा पाऊस न आल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही भागात तर अजूनही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही.
यंदा चांगल्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असले तरी पावसाचे सातत्य व सर्वच भागात सारख्या उपस्थितीचा अभाव शेतकऱ्यांची चिंता वाढवताना दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी सोयाबीनच्या पेरणीलाच प्राधान्य देत असून, या पिकाची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. यामुळे शेतकऱ्यांनी भावनिक न होता चांगला पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले आहे.
पेरणीत उदगीरची आघाडी
जिल्ह्यात कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार खरीपाच्या सहा लाख १२ हजार ४२१ पैकी एक लाख २८ हजार ७६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही टक्केवारी २१ असून, काही तालुक्याची अद्ययावत माहिती अपलोड झाली नसल्याने प्रत्यक्षात टक्केवारी २५ च्या पुढे जाईल, असे श्री. गावसाने यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक उदगीर तालुक्यात ६७ टक्के पेरण्या झाल्या असून सर्वात कमी पेरण्या निलंगा तालुक्यात झाल्या आहेत. तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. लातूर - १५, औसा - २६, अहमदपूर - २९, निलंगा - १, शिरूर अनंतपाळ - १०, चाकूर - २५, रेणापूर - ३, देवणी - ३ व जळकोट - १९.
हेर येथे शंभर टक्के पेरण्या
हेर, ता. २१ (बातमीदार) ः येथे १३ जूनला दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे येथील शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, परिसरातील गावांमध्ये ५० टक्के पेरण्या झाल्या. दरम्यान, आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, ज्यांनी पेरणी केली त्यांचे बियाणे शंभर टक्के उगवले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.
येरोळ परिसरात दुबार पेरणीचे संकट
परिसरात मागील आठवड्यात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. दरम्यान, १५ जूनला मोठा पाऊस पडला. त्यामुळे थापटी बसून सोयाबीनची उगवण होत नसल्याने चित्र आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यंदा मृग नक्षत्रातच पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यात शुक्रवार, ११, १२ आणि १३ जून असे सतत तीन दिवस चांगला पाऊस पडल्याने काही शेतकऱ्यांनी धावपळ करीत १४ आणि १५ जूनला पेरणी केली.
पण, १५ जूनच्या सायंकाळी साडेसात वाजता अर्धा तास मोठा पाऊस पडला. त्यामुळे १४ व १५ जूनला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला. खूप मोठ्या तुटीने सोयाबीनची उगवण होत असल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. काहींचे सोयाबीनची खूप पातळ उगवले आहे. सध्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे १५ जूननंतर ज्यांनी पेरणी केली त्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.