किल्लारी - ‘किल्लारी भूकंप ही नैसर्गिक अवकृपा होती. भूकंपग्रस्तांवर आलेल्या या संकटास धैर्याने सामना केला. भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन हे एक आदर्श निर्माण करून जगाच्या पाठीवर इतिहास घडला. १९९३ मधील त्या रात्री गणेश विसर्जनाचा राज्यातील आढावा घेतला व पहाटे साडे तीन वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर विश्रांतीसाठी गेलो होतो.
तेवढ्यात राज्यात भूकंप झाल्याची माहिती मिळाली. तत्काळ सर्व जिल्हाधिकारी यांना फोन करून माहिती मिळवली, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्व घटनाक्रम उलगडला.
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपाला शनिवारी ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा ५२ गावांमधील ग्रामस्थांकडून आज किल्लारीत झाला. सत्काराला उत्तर देताना आणि जुन्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले, ‘लातूर व धाराशिव जिल्ह्यात मोठा भूकंप झाला असून त्याचा केंद्रबिंदू किल्लारी असल्याचे समजले.
मी लागलीच लातूर व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री विलासराव देशमुख व पद्मसिंह पाटील यांना फोन करून सहा वाजता किल्लारीला येण्याचे सांगितले. मी प्रथम सकाळी सहा वाजता किल्लारीत पोचलो. भयानक परिस्थिती होती. लोक रडत होते. पाऊस पडत होता. अनेक मृतदेह रस्त्यावर पडले होते. हीच परिस्थिती आजूबाजूच्या ५२ गावांत होती. हे आपल्या समोरील संकट आहे. संकटे येत राहतात त्यावर मात करणे समाजहिताचे समजून कामाला लागलो.’
कृतज्ञता सोहळ्याचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीप देशमुख होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार गोपाळराव पाटील, मंत्री राजेश टोपे, खासदार ओमराजे निंबाळकर, मंत्री संजय बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भूकंपग्रस्त ५२ गावांच्या वतीने पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याआधी त्यांनी स्मृतिस्तंभ येथे जाऊन अभिवादन केले.
बसवराज पाटील म्हणाले, की भूकंपग्रस्त जनतेच्या भावना समजून घेऊन शरद पवार यांनी अहोरात्र केलेले काम मी कधीच विसरू शकत नाही. तातडीने पुनर्वसन होणे हे सोपे काम नव्हते; पण पवार यांनी ते करून इतिहास रचला. भूकंपग्रस्त जनतेच्या आरक्षणाचा प्रश्न मी शासन दरबारात मांडणार आहे, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले.
जगभरातून मदतीचा ओघ : पवार
शरद पवार म्हणाले, की राज्यातील वैद्यकीय विभागास बोलावून जखमींना जागेवर उपचार व गंभीर रुग्णांना सोयी उपलब्ध करून दिल्या. देशभरातील स्वयंसेवी संस्था व सरकारी पातळीवर संपर्क करून भूकंपग्रस्त भागात अन्न, दूध, पाणी, कपडे व तात्पुरता निवारा उभारण्याचे काम प्रगतिपथावर केले.
देशाचे तत्कालीन अर्थ मंत्री मनमोहन सिंग यांनी सर्व मदतीचे आश्वासन दिले. अवघ्या दहा दिवसांत जागतिक बँकेचे कोट्यवधींचे कर्ज मंजूर करून दिले. किर्लोस्कर व टाटा यांसारख्या कंपन्यांनी घरे बांधून दिल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.