latest Maharasthra News: कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंज देत असलेल्या मजुराने पुढील उपचारांसाठी पैसे नसल्याने राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. गुरुवारी (ता. १९) सकाळी तालुक्यातील कडा येथील सुंदरनगर भागात ही घटना घडली. अशोक सुभाष वाडेकर (वय ४३ वर्षे) असे मृताचे नाव आहे.
कडा येथील सुंदरनगर भागातील रहिवासी अशोक सुभाष वाडेकर हे मजुरी करून कुटुंबाची उपजिविका भागवित होते. दररोज मिळणा-या अल्पशा मजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्यांना अचानक कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे निदान झाले. यावरील उपचार करून गेल्या काही महिन्यांपासून या आजाराशी झुंज देत होते. मात्र, हातावरील पोट असल्याने व घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना या आजारावरील महागडे उपचार कसे करणार, अशी चिंता सतावत होती.