लातूर : लातूर जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण एप्रिल महिन्यात आढळून आला. तेंव्हापासून आजपर्यंत जवळपास तीन महिन्यात लातूर शहर आणि जिल्ह्यातील तब्बल ३०० घरात कोरोना पोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीनशेपैकी २०० कुटूंबापर्यंत गेल्या दोन आठवड्यात कोरोना पोहोचला आहे. ही आकडेवारी लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना किती वेगाने पसरत आहे, ही बाब निदर्शनास आणून देत आहे. त्यामुळे आतातरी प्रशासन काही कठोर पावले उचलणार का आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण ४ एप्रिल रोजी आढळून आला. तेव्हापासून २२ जूनपर्यंत शहर आणि जिल्ह्यातील १०० कुटुंबात कोराना पसरला होता. टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे आणि परराज्यातील, परजिल्ह्यातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात लातूरात वाढल्याने कोरोनाचा हा आलेख दिवसेंदिवस वाढत राहीला. त्यामुळे ज्यांनी परजिल्ह्यात किंवा परराज्यात प्रवास केला नाही, अशा नागरिकांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले
तीनशे कुटूंबापैकी ८१ कुटूंबात १ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. यातील एका कुटूबांत तब्बल १५ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुटूंबातील २ ते ५ जणांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, २१९ कुटूंबात केवळ एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. आजवर कोरोनाचा आलेख ५४८ रूग्णांपर्यंत पोचला आहे.
यातील २२३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर २९८ जण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले आहेत. उपचारादरम्यान आजवर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील १५ मृत्यू लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत, ११ मृत्यू उदगीरमधील सामान्य रुग्णालयात तर एक मृत्यू पुण्यातील खासगी रुग्णालयात झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी जाहीर केली.
ही आहेत कारणे
कोणकोणत्या कारणांमुळे कोरोनाची लागण होत आहे, याची वर्गवारी आरोग्य विभागाने केली आहे. यात व्यापार करणे (२३ रुग्ण), लग्न सोहळ्यात सहभागी होणे (३२), इतर ठिकाणाहून प्रवास करून लातुरात येणे (५३), खासगी समारंभाला उपस्थित राहणे (२७), धार्मिक सोहळ्याला हजर राहणे (१९) ही कारणे सर्वाधिक रुग्णांकडून मिळत आहेत. उर्वरित रुग्णांकडून इतर कारणे सांगितली जात आहेत. ही माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केली. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर विशेष काळजी घेणे सध्या गरजेचे बनले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.