लातूर - काही वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. सर्व तयारी झाली आहे. यातच वीज पुरवठा खंडीत होतो. लाइनमनकडून रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर (डीपी) फेल झाल्याचा सांगावा येतो. ऐनवेळी जनरेटरची सुविधा होत नसल्याने आयोजकांची पाचावर धारण बसते. डीपी दुरुस्त करून बदलून येईपर्यंत मोठा कालावधी जातो.
यात कार्यक्रम रद्द होण्यासह अनेक अडचणी येऊन पाण्याअभावी पिकेही वाळून जातात. महावितरणने यावर अफलातून उपाय शोधला आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत डीपी बसवून ही ट्रॉलीची डीपी गरजेच्या आणि तातडीच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. यामुळे डीपी नादुरूस्त होण्याच्या घटनेमुळे होणारे नुकसान व अडचण झटक्यात दूर होणार आहे.
राज्यात पहिल्यांदाच लातूर जिल्ह्यात ‘पॉवर ऑन व्हील्स’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील या योजनेत आठ डीपी तयार करण्यात येणार असून पहिली डीपी दोन महिन्यात उर्वरित सात डीपी मार्चअखेरपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे यांनी दिली. सर्व ठिकाणी वीज पुरवठ्यातील डीपीला महत्त्व आहे.
डीपी जळाला किंवा तो नादुरूस्त झाल्यानंतर ट्रॅक्टरने किंवा ट्रकने फिल्टरला नेण्यात येतो. तिथेही दुरुस्त न झाल्यास संबंधित एजन्सीकडे पाठवण्यात येतो. डीपी दुरुस्तीचे कंत्राट घेतलेल्या एजन्सीकडे नवीन डीपी असत नाही.
यामुळे डीपी दुरुस्त करून तो येईपर्यंत आठ ते पंधरा दिवस कालावधी जातो. या काळात वीज पुरवठा बंद राहून ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरजेचे वेळी वीज न मिळाल्याने पिकांचे नुकसान होण्यासह काही ठिकाणी तातडीने कार्यक्रमही रद्द करावे लागते.
अशावेळी तातडीने डीपी दुरुस्ती व पहिला डीपी काढून त्या ठिकाणी नवीन डीपी बसवणे शक्य होत नाही. याला महावितरणने ट्रॉलीच्या डीपीचा जालीम उपाय शोधला आहे.
अचानक डीपी नादुरूस्त झाल्यानंतर तातडीने उपाययोजनेसाठी काय करता येईल, याबाबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काही उपाययोजना तपासून घेण्याची सूचना केली होती. मी ठाणे येथे कार्यरत असताना तिथे अशा प्रसंगात पॅक (बंदीस्त) डीपीचा वापर केला जात होतो. त्याला हात लावल्यास शॉक बसत नव्हता. तो जमिनीवर आणून ठेवणे शक्य होते. त्याला हलवता येत नव्हता.
या योजनेत ट्रॉलीमध्ये डीपी असल्याने तो ट्रॅक्टरच्या साह्याने कोठेही घेऊन जाणे शक्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांचे योजनेसाठी मार्गदर्शन आहे.
- मदन सांगळे, अधीक्षक अभियंता, लातूर.
अर्धा तासात ट्रॉलीचा डीपी
महावितरणच्या जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी हा डीपी ठेवण्यात येणार आहे. गरजेप्रमाणे त्याचा वापर करण्यात येणार आहे. तातडीने डीपी दुरुस्त करून वीज पुरवठा करणे शक्य नसेल त्या ठिकाणी व तेथील निकड लक्षात घेऊन लावण्यात येणार आहे. उसातील डीपी जळाला व शेतकऱ्याने उसाला पाणी दिले असेल तर तेथील डीपी बदलणे शक्य होणार नाही.
अशा ठिकाणी पूर्वीच्या डीपीपासून शंभर मीटर अंतरावर हा ट्रॉलीचा डीपी उभा करूनही वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे. शेती, गाव, रुग्णालय परिसर, कार्यक्रमाच्या ठिकाणी व आपत्ती व्यवस्थापनासाठी कॉल आल्यानंतर उपलब्ध असेल तर अर्धा तासात हा डीपी पाठवला जाणार असल्याचे श्री. सांगळे यांनी सांगितले.
डीपी विथ ट्रॅक्टर ट्रॉली
या योजनेत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्येच डीपी तयार करून ठेवण्यात येणार आहे. डीपीचे वायर बाहेर काढून ठेवण्यात येणार आहेत. नादुरूस्त डीपीच्या ठिकाणी ही डीपीची ट्रॉली नेऊन उभी करायची व वायर जोडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. पहिला डीपी दुरुस्त करून आला की ट्रॉलीचा डीपी परत नेण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी असे आठ डीपी खरेदी करण्यात येणार आहेत. एका डीपीसाठी पाच लाख ८४ हजार रुपयांचा खर्च येणार आहे.
यासाठी जिल्हा नियोजन समितीने नावीन्यपूर्ण उपक्रमातून महावितरणला ४६ लाख ७२ हजाराचा निधी मंजूर केला आहे. पहिलाच प्रयोग असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व चाचण्या घेतल्या आहेत. सरकारच्या ऊर्जा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडूनही परवानगी घेण्यात आली आहे. सध्या डीपी खरेदीची प्रक्रिया निविदा स्तरावर असल्याचे श्री. सांगळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.