औसा : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अगोदरच अतिरिक्त पाऊस व गोगलगायीच्या प्रादुर्भावाचे संकट ओढवलेले असताना आता आणखी एक नवे संकट उभे राहण्याची शक्यता दिसून येत आहे. लवकर पेरणी केलेल्या सोयाबीनवर विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे असल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत.
लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावामधे मे व जून महिन्यात सोयाबीनची पारंपारिक पद्धतीने व टोकन पद्धतीने पेरणी करण्यात आली आहे. आशा क्षेत्रात विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यापूर्वी जूनपासूनच गोगलगायींचा बंदोबस्त करण्यासाठी विविध उपाययोजना करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तोवरच पावसाने उघडीप दिल्यानंतर कशे तरी मशागतीला वेग आला असताना, या विषाणूजन्य मोझॅक रोगाने तोंड वर काढले आहे. यामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिवळे जर्द होऊ लागल्याने शेतकरी धास्तावला आहे.
रोगावर बारकाई लक्ष ठेवणे गरजेचे
जिल्ह्यतील बहुतांश गावामधे मे व जून महिन्यात केडीएस-७२६ (फुले संगम) व केडीएस - ७५३ (फुले किमया) या सोयाबीन वाणाची लागवड करण्यात आली असून या वाणांत या रोगांचा प्रादुर्भाव जास्त आढळून येत आहे. या विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगामुळे जगातील बऱ्याच सोयाबीन उत्पादक देशातील सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे संदर्भ असल्यामुळे भविष्यामध्ये या रोगावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अशा करा उपाययोजना
सोयाबीन पिकात एखाद्या झाडावर रोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ, असे झाड उपटून नष्ट करावीत. कोणत्याही विषाणूजन्य रोगांमध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे रोगाची लागण आणि त्याचा प्रसार होण्याचे माध्यम ओळखणे व त्याचे वेळेवर नियंत्रण करणे. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने पांढरी माशी या किडीमार्फत होतो, यावर तात्काळ उपाय केले तरच, हा प्रादुर्भाव आटोक्यात येतो.
अन्यथा सोयाबीन उपटून टाकल्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे पांढरी माशीबरोबरच व इतर किडीच्या एकत्रित नियंत्रणासाठी थायमेथोक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४ मिली किंवा बीटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड ७ मिली अशा पूर्वमिश्रित कीटकनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे, असे अहावान मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ प्रा. संदीप देशमुख यांनी केले आहे.
या रोगाची लक्षणे
या रोगामुळे झाडांची पाने आकाराने लहान होतात. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट; तर काही भाग पिवळसर दिसून येतो. बाधित झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते. शेंगाची संख्या देखील कमी होते. तसेच शेंगांवर काळसर डाग आढळून येतात. या रोगामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेबरोबरच उत्पादनामध्ये लक्षणीय घट होऊ शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.