लातूर : जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या आठवड्यापर्यंत जोत्याखाली पाणीपातळी असलेल्या तावरजा (ता. लातूर) व रायगव्हाण (ता. कळंब) हे दोन्ही मध्यम प्रकल्पांची मंगळवारी (ता. २८) ओव्हरफ्लोकडे वाटचाल सुरू आहे. सकाळी दोन्ही प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा आला होता. जिल्ह्यात मंगळवारी रात्री सरासरी ६७ मिलिमीटर पाऊस झाला असून देवणी, शिरूर अनंतपाळ व निलंगा तालुके वगळता उर्वरित सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १२७ मिलिमीटर पाऊस लातूर तालुक्यातील मुरूड व तांदुळजा मंडळात पडला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील सर्व लहानमोठे प्रकल्प भरून वाहिले असताना गेल्या आठवड्यापर्यंत तावरजा व रायगव्हाण प्रकल्पात मृतसाठ्यातच पाणी होते. चार दिवसापासून पावसात जोर वाढल्यानंतर दोन्ही प्रकल्पात पाणी येण्यास सुरूवात झाली. मंगळवारी रात्रीच्या पावसाने तर दोन्ही प्रकल्पांचा न भरण्याचा विषय संपवून टाकला. रात्रीतूनच प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा आला आहे. पाण्याची आवक लक्षात घेता दोन्ही प्रकल्प दिवसभरात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली.
मंगळवारी रात्री नऊपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत दणक्यात कोसळत होता. मुसळधार पावसाने नदी, नाले व ओढ्यांना पाणी येऊन जनजीवन विस्कळीत झाले. पुलावरून पाणी वाहत असल्याने लातूर ते उदगीर रस्त्यावर घरणीनदीला पाणी आल्याने वाहतुक बंद पडली. मुरूड ते अंबाजोगाई रस्त्यावर देवळा येथील मांजरा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक बंद झाली. शिरूर अनंतपाळ ते लातूर रस्त्यावर बोरी ते चामेवाडी दरम्यान असलेल्या मांजरा नदीच्या पुलावरून सात फुट उंचीवरून पाणी वाहत असून या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने मांजरा नदीला पुर आला असून नदीने रौद्ररूप धारण केले आहे. सलग पडलेल्या पावसामुळे शिवारात पाणी साचून काढणीला आलेले सोयाबीनचे पिक पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्रीचा सर्वाधिक १२७ मिलिमीटर पाऊस तांदुळजा व मुरूड महसूल मंडळात पडला असून तोंडार (ता. उदगीर) येथे १०१ तर चाकूर मंडळात १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.