लातूर : देशाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त लातूर महानगरपालिकेच्या वतीने अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. शहरात घंटागाड्यांची स्वच्छता रॅली काढून तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन गाडगेबाबांना अभिवादन करतानाच शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. संत गाडगेबाबा यांची रविवारी (ता.२०) पुण्यतिथी होती.
यानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने रोज शहरातून कचरा संकलन करणाऱ्या दीडशे वाहने, घंटागाड्यांची स्वच्छता रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करून या रॅलीला सुरवात करण्यात आली. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या रॅलीचा प्रारंभ केला. याप्रसंगी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, महापालिका उपायुक्त मंजुषा गुरमे, नगरसेवक विकास वाघमारे, आस्थापना विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, जनाधार संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छतादूत, स्वच्छताताई यांच्यासह सर्वांच्या प्रयत्नातूनच आपले लातूर शहर स्वच्छ आणि सुंदर होत आहे. या कार्यातील सातत्य टिकवण्याची गरज आहे. लक्ष २०२१ आपण सर्वांनी स्वीकारलेले आहे. आज स्वच्छतेच्या बाबतीत लातूर १३७ व्या क्रमांकावर असून, त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे ध्येय ठरवले आहे. हे लक्ष आपण पूर्ण करू शकतो. त्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचे श्री. गोजमगुंडे म्हणाले. यामध्ये लातूरकरही खूप सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
नागरिकांच्या सहकार्याच्या विना शहर स्वच्छ ठेवणे शक्य नसल्याने त्यांचा सहभाग वाढविण्याकरिता जनजागृती करण्यासाठी या रॅली आयोजन करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.मनपाच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी स्वच्छता शपथ घेण्यात आली.
प्लॅस्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करून पर्यावरणाचे संवर्धन करणे तसेच स्वच्छतेच्या बाबतीत शहराचा समावेश पहिल्या दहा शहरात करण्याची शपथ या वेळी सर्वांनी घेतली. स्वच्छता रॅलीच्या माध्यमातून शहरभर घंटानाद करत ही रॅली आंबेडकर पार्कपासून गंजगोलाई, शाहू चौक, विवेकानंद चौक परत शाहू चौक, गूळ मार्केट, गांधी चौक, अशोक हॉटेल, शिवाजी चौक, नंदी स्टॉप, राजीव गांधी चौक परत नंदी स्टॉप, शिवाजी चौक, पीव्हीआर चौक परत शिवाजी चौक, अंबाजोगाई रोड, अहिल्यादेवी होळकर चौक, शिवाजी चौक या मार्गे निघालेल्या या स्वच्छता रॅलीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोप करण्यात आला.
Edited - Ganesh Pitekar
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.