लातूर : स्वातंत्र्यांच्या चळवळीत लातूरच्या स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान राहिले आहे. निजामाच्या विरोधात बंडाचे ठिकाण म्हणूनही लातूरकडे पाहिले जाते. देश स्वातंत्र्य झाला तरी लातूर मात्र निजाम राजवटीतच होते. एक वर्ष उशिराने लातूरला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा आजपासून अमृत महोत्सव सुरु होत आहे. गेल्या ७४ वर्षात लातूरच्या प्रगतीच्या पंखांना चांगलेच बळ मिळाले. इतर जिल्ह्याच्या तुलनेत लातूरची राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कृषी क्षेत्राचा लक्षणीय विकास झाला. या पुढील काळातही जिल्ह्याच्या मुलभूत सुविधासह विकासाला आणखी मोठा वाव आहे.
राजकीयदृष्ट्या सक्षम
लातूर राजकीय दृष्ट्या सक्षमच राहिले आहे. त्यात स्वातंत्र्यानंतर तर देविसिंह चौहान, केशवराव सोनवणे, शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख असे नेते जिल्ह्याला मिळाले. दिवंगत निलंगेकर व विलासराव देशमुख यांच्या रुपाने तर लातूरला मुख्यमंत्री पदही मिळाले. तर चाकूरकर यांच्या रुपाने लोकसभेचे सभापतीपद व गृहमंत्री पद देखील लातूरला मिळाले. त्यानंतर दिलीपराव देशमुख, बाळासाहेब जाधव, अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, संजय बनसोडे आदींनी मंत्रीपदेही भूषवली.
शिक्षणाचा वेगळा पॅटर्न
लातूरमध्ये निजाम राजवटीत तर केवळ एक माध्यमिक विद्यालय होते. इतर कोणतेही शिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. पण स्वातंत्र्यानंतर मात्र शिक्षणाच्या सोयी येथे उपलब्ध झाल्या. गेल्या काही वर्षात तर लातूरने शिक्षणाचा पॅटर्नच तयार केला आहे. डॉक्टर, इंजिनिअरसोबतच आज येथील मुले आयएएस, आयपीएस होत आहेत. लातूर जिल्हयातंर्गत कला, वाणिज्य, विज्ञान, औषधनिर्माण शास्त्र, विधी, अभियांत्रिकी, वैद्यकीय अनुदानित ३६ महाविद्यालय, कायम विनाअनुदानित ८० असे एकूण ११६ महाविद्यालय आहेत. लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
कृषी क्षेत्राला संजीवनी
लातूर ही स्वातंत्र्य पूर्व काळापासून मुख्य बाजारपेठ राहिली आहे. शेती क्षेत्राशीच निगडीत ही बाजारपेठ होती. वेगवेगळे बदल शेतकऱ्यांनी स्वीकारून शेतीला पुढे नेण्याचे काम केले. आज साडे चार लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीन पेरले जाते. ऊसामुळे तर अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आली. मांजरा धरण व इतर लहान मोठ्या प्रकल्पांमुळे सिंचनाची सोय झाली. मांजरा नदीच्या १२५ किलोमीटर पात्रात उच्चस्तरीय बंधारे उभारल्याने सिंचनाच्या पाण्याची मोठी सोय झाली.
सहकार आणि औद्योगिक विकास
स्वातंत्र्यानंतर येथे सहकार चळवळीनेही चांगले बाळसे धरले. सुरवातीला डालडा फॅक्टरी, जवाहर सूतगिरणी हे दोन प्रमुख संस्था राहिल्या. त्यानंतर लहान मोठ्या सहकारी संस्था उभ्या राहिल्या. मांजरा व इतर सहकारी साखर कारखान्यानी देशात कारखानदारीत आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आजही शेतकऱ्यांची जीवन वाहिणी काम करीत आहे. दुसरीकडे येथील एमआयडीसीचा विकास झाला. शेकडो कारखाने उभे राहिले. यातून हजारो रोजगार उपलब्ध झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.