लातूर : डेंगीची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचे अचूक निदान होण्यासाठी आवश्यक असलेली व्हायरोलॉजी (सेंटिनल) लॅब अद्याप लातुरात उभी राहिलेली नाही. विशेष म्हणजे, केंद्र शासनाने यास पूर्वीच मान्यता दिलेली आहे. तरीही ही लॅब सध्या कागदावरच आहे. त्यामुळे लातुरातील रुग्णांचे नांदेड किंवा पुण्यातील लॅबमध्ये रक्तजल नमुने तपासण्यासाठी पाठवावे लागत आहेत. ते पाठवल्यानंतर चक्क आठ दिवसांनी रुग्णांना रिपोर्ट मिळत असल्याचा ‘तापदायक’ प्रकार लातूरमध्ये सध्या दिसून येत आहे.
डेंगीची लक्षणे आढळून आल्यानंतर पेशंटच्या रक्ताच्या विविध चाचण्या केल्या जातात. सध्या काही रुग्णालयांत रॅपिड अँटिजन टेस्ट किंवा एलायझा चाचण्या होत आहेत. पण, यातून डेंगीचे निदान योग्य होईलच, याची शाश्वती नाही. म्हणून या बाबतीत व्हायरोलॉजी (सेंटिनल) लॅब असणे नितांत आवश्यक आहे.
यातून डेंगीची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचे अचूक आणि वेळेवर निदान होते. म्हणून अशा प्रकारची लॅब लातुरात उभारण्याबाबत येथील आरोग्य विभागाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास सरकारने सहा महिन्यांपूर्वीच मान्यताही दिली आहे. पण, ही लॅब अद्याप प्रत्यक्षात उभी राहू शकली नाही.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात २०० हून अधिक संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी नांदेडला पाठवण्यात आले होते. त्यातील ७४ जणांना डेंगीच्या डासांनी डंख मारल्याचे समोर आले आहे. यासोबतच चिकनगुण्याचे रुग्ण आढळून येण्यास सुरवात झाली आहे. डेंगी हातपाय पसरत आहे.
त्यातच शहरातील रुग्णालयात संशयित रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. रॅपिड अँटिजन टेस्टचा वापर करून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ येत आहे. पण, अशा चाचण्यांची शाश्वती नसल्याने काही प्रकरणांत डॉक्टरांमध्येही संबंधित रुग्णांवर कोणता उपचार करावा, याबाबत संभ्रम वाढत आहे.
शहरात डेंगीचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे याचे योग्य निदान होण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळांची नितांत आवश्यकता आहेच. पण, याच्या जोडीला शहरात डेंगी आणखी वाढू नये, त्याचा प्रसार रोखला जावा म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक जोमाने हाती घेणे हेही तितकेच गरजेचे आहे.
— डॉ. राजेश पाटील, वैद्यकीय तज्ज्ञ, लातूर.
लातूरात सेंटिनल लॅब असावी यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. यास मान्यता मिळाली आहे. पण, तांत्रिक कारणांमुळे ही लॅब सुरू नाही. पण, ती लवकरच सुरू होईल. सध्या लातुरातील संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने आम्ही नांदेडच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवत आहोत.
— डॉ. संतोष हिंडोळे, जिल्हा हिवताप अधिकारी, लातूर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.