माजलगाव : शासनाच्या कठोर भूमिकेमुळे मागच्या काही काळात मराठा आंदोलनाची धग काहीशी कमी झाली असली तरी, लोकसभेला मोठ्या संख्येने उमेदवार देऊन सरकारला अडचणीत आणण्याची रणनीती सुरु आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एका गावातून चार ते पाच उमेदवार उभा करण्याची रणनीती मराठा समाजाची सुरु आहे. उमेदवारांची संख्या हजाराच्या घरात गेल्यानंतर ही निवडणूक कशी होणार, याबाबत संभ्रम आणि चर्चेला उधाण आले असताना निवडणुकीत ईव्हीएम मशिन का, मतपत्रिका याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईला धडक दिली होती. लाखोचा मराठा समाज मुंबईच्या वेशीवर रोखून स्वतः सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय अध्यादेशही काढला.
त्यानंतर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के वेगळे आरक्षण सरकारने जाहीर केले; परंतु आरक्षणाचा लढा देणाऱ्या मनोज जरांगेंनी हे मान्य केले नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत जरांगे पाटलांनी त्यांच्या मुंबईच्या शासकीय बंगल्याची वाट धरली होती;
परंतु सरकारने कठोर भूमिका घेत कारवाया सुरु केल्या. यामुळे सध्यातरी मराठा आरक्षण आंदोलनाची धग कमी झाली असली तरी, ओबीसीतून आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यावर मराठा समाज ठाम आहे.
मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून चार ते पाच उमेदवार देण्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत. असे झाले तर, ईव्हीएम मशिनवर मतदान घेणे शक्य होणार नाही. मराठा समाजाची ह रणनीती प्रत्यक्षात अमलात आली तर, होणारी निवडणूक कशी होणार, ही निवडणूक ईव्हीएम मशिनवर घेतली जाईल का, मतपत्रिकेचा वापर केला जाईल, याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.
लोकसभेसाठी सुरु असलेल्या मराठा समाजाची रणनीती प्रत्यक्षात उतरल्यावर येणाऱ्या अडचणीला कसे तोंड द्यायचे, याबाबत धाराशीवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. यानंतर याबाबतच्या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे.
सरकार आपली मागणी मान्य करत नाही, आंदोलन केल्यावर गुन्हे दाखल करत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार उभा करण्यासाठी मराठा समाजाच्या गावोगाव बैठका घेण्यात येत आहेत. बीड येथील पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनीही याबाबत भाष्य केल्याने कदाचित असे होऊ शकते.
एकावेळी एका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवार असलेल्या जास्तीत जास्त २४ मशिन जोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे जास्तीत-जास्त ३८४ उमेदवारांचीच निवडणूक ईव्हीएम मशिनवर घेतली जाऊ शकते; परंतु मराठा समाजाची रणनीती यशस्वी झाल्यास उमेदवाराची संख्या हजाराच्या पुढे जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.