लोहारा : व्यक्तीच्या बौद्धिक जडणघडणीत साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते. साहित्य जनमानसात पोचविण्यासाठी वाचनालयाची भूमिका मोलाची असते. सामाजिक मूल्ये जागणारी, संस्कार रुजविणारी वाचनालये म्हणजे त्या-त्या शहरांचे सांस्कृतिक वैभव असते. असेच वाचनालय लोहारा शहरात ७४ वर्षांपासून कार्यरत आहे. ‘लोकवाचनालय’ असे त्याचे नाव. पुस्तकाचे पान उघडावे, यासाठी या वाचनालयात चहापानाचीही व्यवस्था आहे. अशा काही उपक्रमांतून वाचनसंस्कृती वृद्धिंगत करीत ज्ञानाची भूक भागविण्याचे काम ते करीत आहेत.
स्वातंत्र्यसैनिक नारायणराव लोहारेकर यांच्या पुढाकारातून, स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेबांच्या पाच हजार रुपयांच्या देणगीतून लोहारासारख्या ग्रामीण भागात १९५० मध्ये या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता हे वाचनालय शहरासह तालुक्याची सांस्कृतिक ओळख बनले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पोलिस ठाणे मार्गावर वाचनालयाची वास्तू आहे. त्यात प्रशस्त वाचन कक्ष, बाल विभाग, ग्रंथ विभाग, बैठक हॉल, कार्यालय आदी विभाग आहेत. वाचनालयास तालुका ‘अ’ वर्गचा दर्जा मिळालेला आहे. २००२ मध्ये शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्काराने या वाचनालयाचा गौरव केला आहे.
वाचनालयाच्या बाजूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूल आहे. मधल्या सुटीत विद्यार्थी विविध पुस्तके हाताळण्यासाठी वाचनालयात दाखल होतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुणही वाचनालयाचा आधार घेतात.
वाचकांना दिले जाते चहापान
मोबाइल, इंटरनेटमुळे जग अगदी जवळ आले आहे. मोबाइलचा अतिवापर होत असल्याने वाचकांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. असे असले तरी वाचकसंख्या वाढावी, यासाठी वाचनालयाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून वाचनालयात आलेल्या वाचकांना नियमित चहापान देण्यात येते. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाचनालयास भेटी दिल्या असून, कौतुक करून तसा अभिप्राय नोंदविला आहे.
वाचनालयात काय?
विपुल ग्रंथसंपदा
विविध भाषिक पंचवीसहून अधिक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दिवाळी अंक उपलब्ध.
२९ हजारांहून अधिक ग्रंथ, पुस्तके. त्यात कादंबरी, ललित साहित्य, काव्य, धार्मिक, कथा, विनोदी साहित्य, चरित्रग्रंथ, इतिहास, बालसाहित्य, शेती, संदर्भग्रंथ, राजकारण, मराठी विश्वकोष, संस्कृतीकोष, चरित्र खंड, संत साहित्य, पुराणग्रंथ आदींचा समावेश. स्पर्धा परीक्षार्थी, संशोधक विद्यार्थ्यांसाठी पुस्तके.
हिंदी-इंग्रजी साहित्याचाही समावेश.
ग्रामीण भागातील हे सर्वात मोठे वाचनालय आहे. २९ हजारांहून अधिक ग्रंथ आहेत. वाचक सभासदसंख्या पाचशेपेक्षा अधिक आहे. वाचनालयाकडून सांस्कृतिक उपक्रम, ग्रंथ प्रकाशन, व्याख्यानमाला घेतली जाते. काही वर्षांपासून वाचकसंख्या कमी झाली आहे. ती पुन्हा वाढावी, यासाठी प्रयत्न केले जातात. आलेल्या वाचकांना चहापान देण्यात येतो.
— संजय जेवळीकर, ग्रंथपाल, लोकवाचनालय, लोहारा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.