अवकाळी पावसाने ज्वारी, करडी पिकाचे नुकसान

deglur 1.jpg
deglur 1.jpg
Updated on


देगलूर, (जि.नांदेड) ः शहरासह तालुक्यात मंगळवारी (ता. ३१) सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचा हलकासा शिडकावा शरीराला अल्हाददायक वाटत असला तरी शेतकऱ्याच्या संकटात भर घालणारा ठरला. कुठे ज्वारीची काढणी सुरू आहे, कुठे ज्वारी उभीच आहे, तर कुठे करडीचीही काढणी चालू आहे. अचानकपणे आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. या पावसात जमिनीवर काढून ठेवलेली ज्वारीच्या कणसांना पाणी लागल्याने ती काळी पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तर उभी असलेली ज्वारी आडवी पडल्याने व त्याला पाणी लागल्याने तीही काळी पडू शकते. त्यामुळे त्यांच्या संकटांत नवीनच भर पडली आहे.

कोरोनामुळे भाजीपाल्याचे भावही गडगडले
संपूर्ण देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने आहाकार माजवला असतानाच शेतकऱ्यांकडील भाजीपाला कोणीही न्यायला तयार नाही, शहरात आणायचे तर वाहतुकीचा प्रश्न, पुन्हा त्यात वेळेचे बंधन, सर्वत्र लॉकडाउन असल्याने भाजीपाला ब्रोकरही शेतकऱ्यांचा माला घ्यायला तयार नाहीत. आर्थिक फटका सहन करून शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला असताना ते अशा संकटात सापडल्याने त्याची विक्रीही होताना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पिकलेला भाजीपाला जागेवरच सडत आहे. या सर्वांचा परिणाम भाजीपाला खरेदीवर झाल्याने भाव पडले आहेत.


लिंगन केरूर येथे चार शेळ्या दगावल्या
बुधवारी (ता. एक) सकाळी लिंगन केरूर येथील गंगाराम कोंडिबा बजिरे या शेतमजूर शेतकऱ्याने आपल्या पाळीव शेळ्या चारण्यासाठी तलाव परिसरात नेल्या. तेथील वैरण खाल्ल्यानंतर त्यांनी तलावातील पाणी पिले व लगेच त्या जागीच गतप्राण झाल्या. यामुळे पीडित शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. पीडित शेतकऱ्याला प्रशासनातर्फे मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी या वेळी केली.

देगलूर मध्ये २९ मिलिमीटर पाऊस
मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी पडलेला अवकाळी पाऊस देगलूर मंडळात ११ मिलिमीटर, खानापूर मंडळात दोन मिलिमीटर, शहापूर मंडळात १६ मिलिमीटर तर मरखेल, माळेगाव, हाणेगाव या तीन मंडळांत पाऊसच झाला नाही. या अवकाळी पावसाने देगलूर तालुक्याच्या काही भागात ज्वारी, करडई, भाजीपाला, आंबा, पपई, टरबूज या पिकांचे नुकसान झाले अाहे. कोरोनाच्या संकटातून मार्ग काढीत असतानाच शेतकऱ्यांपुढे निसर्गाने दुसरे नवीन संकट उभे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.