सेलू : गेल्या दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे २४ तासात लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत ७५ टक्क्यांवर पोहचल्याने सेलू शहरासह दुधना नदीकाठावरील अनेक गावांचा पिण्याचे पाणी व रब्बी हंगामातील पिकांना कालव्यातून चार पाणी आवर्तन सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, यंदा तरी प्रकल्पात शंभर टक्के जलसाठा होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जालना जिल्ह्यात विशेषतः चितळीपुतळी, बदनापूर, रांजणी या भागात पाऊस झाल्यानंतर लोअर दुधनेत मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होते. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर विशेषकरून मंठा व परतूर तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने या परिसरातील पाण्याचा दुधना प्रकल्पात वेगाने साठा झाला आहे.
शनिवारी सकाळी प्रकल्पात केवळ २४ टक्के पाणीसाठा होता. परंतु, दोन दिवस संततधार पाऊस झाल्यानंतर काही तासाच प्रकल्पातील पाणी पातळी ७० टक्क्यांहून अधिक झाली. परिणामी, सोमवारी रात्रीपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रकल्पाचे आठ दरवाजे उघडून नदीपात्रात १३,००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला.