धाराशिव : लोकप्रतिनिधींनी लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धावून जायला हवे. शेतकऱ्यांच्या समस्यांची तात्काळ सोडवणूक करायला हवी. सातत्याने असे कार्य करत राहिल्यास, निवडणुकांत दारोदारी भटकण्याची पाळी येणार नाही. केलेले काम लोक लक्षात ठेवतात. आयुष्यभर त्याची जाण राखतात. काम केल्याची पावती लोक निश्चितच निवडणुकांतून दाखवून देतात. आपण शेकडो कोटींची कामे केलेली आहेत आणि करत आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले.
रविवारी (ता. १४) दुपारी धाराशिव येथे महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपिठावर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह महायुतीतील चौदा पक्षांच्या जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्याच्या कोणत्या भागात कोणत्या विकास कामांची गरज आहे. हा रोडमॅप जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे असायला हवा. जो आपल्या घराच्या उंबऱ्यापर्यंत विकास आणील, जो आपल्या शेताच्या बांधापर्यंत विकास आणेल तो आपला नेता. या मताचा मी आहे. शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल, तर त्याच्या शेतात पाणी कसे पोचेल, यावर काम केले पाहिजे. कोण, कुठल्या पक्षाचा यांच्याशी शेतकऱ्याचे देणेघेणे नसते. तो तुमच्या दाराला भीक मागायला येणारही नाही. मात्र त्याच्या उत्पादनाला भाव आणि शेताला पाणी देण्याचे काम करायला हवे.
सहकारी सोसायटीपासून राष्ट्रीयकृत बँकाकडे तो आर्थिक मदतीसाठी महिनोनमहिने चकरा मारतो. हे एक दुष्टचक्र आहे. यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा मार्ग हे त्याच्या शेतीला पाणीपुरवण्याची व्यवस्था निर्माण करणे आहे. हे केल्यास, हे काम तो कदापि विसरणार नाही. हे काम आपले सरकार आले तेंव्हा आपण करून घेतले आहे.
उजनी धरणातून जिल्ह्याला पाणी मिळावे, म्हणून हजारो कोटींची योजना मंजूर करून घेतली. आज त्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले. सुरुवारीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा कारभार सांभाळत होते. तेंव्हा आपण त्याची मंजुरी घेतली असेही सावंत या वेळी म्हणाले.
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणा पाटील, आम्ही मिळून प्रस्थापितांना हादरा देत जिल्हा परिषदेत सत्तांतर केले. खऱ्या अर्थाने त्या दिवसांपासून सत्तांतरास सुरुवात झाली. देर आये, दुरुस्त आये. असे त्यांनी ठासून सांगितले. येथील विद्यमान खासदार दोन महिन्यात माजी होणार आहेत.
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कुठलीही एक केंद्रीय योजना जिल्ह्यासाठी आणल्याचे दाखवून द्यावे. असे जाहिर आव्हानच त्यांनी विद्यमान खासदार ओमराजे राजेनिंबाळकर यांना दिले. आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी पाचशे कोटींचा निधी आणला. त्यांनी काय आणले असेही ते म्हणाले. विकास कामे, लोकांची कामे आणि कार्यकर्त्यांच्या बळावर, आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी होईल. असा विश्वास दोघांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.