मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे महाराष्ट्रभर शांतता यात्रा काढत आहेत. आज बीडमध्ये त्यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली. आठ दिवसात कुणाला पाडायचं नावं जाहीर करतो, असा इशारा जरांगे यांनी दिला.
विरोधकांना इशारा-
मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला पाडायचं हे आठ दिवसात सांगणार असल्याचा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्यांना आता सोडायचं नाही. छगनराव आप्पा, आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलं आहे, बाकीच्यांना मानलं नाही."
विधानसभेत उलटं पाडायचा निर्धार-
मनोज जरांगेंनी विधानसभेत उलटं पाडायचा निर्धार व्यक्त केला आहे. "आता चूक नाही करायची... यांना उलट पालट करायचं," असे त्यांनी ठामपणे म्हटले. आठवडाभरात कुणाला पाडायचं हे मी सांगणार, असे त्यांनी स्पष्ट केले. "तिकिट मागणाऱ्यांनी मला बेजार केलाय," असेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला एकजुटीने आपले हक्क मिळवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या एकजुटीचा दाखला देत इशारा दिला की, "मराठ्यांनी मस्ती उतरायची ठरवली तर काय होईल, बाळ शहाणा असशील तर शहाणा होय." त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा दिला.
जातीयवादाचा आरोप-
अंतरवली येथे आंदोलन घडवून आणले होते, यावर मनोज जरांगेंनी विचारले, "याला जातीयवाद म्हणत नाहीत का?" छगन भुजबळ यांच्यावर टीका करत त्यांनी म्हटले, "छगन भुजबळ पुण्यात गेला अन हिंदीत शेर म्हणाला तलवार घाशिंगे... काय बोलायचं!"
मराठा समाजाला एकजुटीचं आवाहन-
मनोज जरांगेंनी मराठा समाजाला एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन केले. "मतदान करतांना मराठ्यांनी कुणालाही शंभर टक्के मतदान करायचं आहे," असे त्यांनी म्हटले. जरांगेंनी सांगितले की, "प्रत्येक मतदार संघातील आपलं 10 हजार मतदान जिकडे जायला नको होतं तिकडं गेलं. आणि राज्यातील 20 हजार मतदान हे न केल्याने वायला गेलं."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.