परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यात अनेक सेवाभावी संस्था, समाजसेवक, कार्यकर्त्यानी ‘कोरोना’ विरुध्दच्या लढ्यात आपला सेवाभाव जपत अनेकांना मदतीचा हात दिला आहे.
कोरोनाने अख्या जगाला विळखा घातलेला असून शहरासह जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. प्रशासकीय पातळीवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत तर बहुतांश नागरिकदेखील त्याला सहकार्य करीत असल्याचे शहरासह जिल्ह्यात चित्र दिसून येत आहे.
लोकप्रतिनिधी, समाजसेवक आपआपल्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काहीजण रस्त्यावर उतरून मदतीचा हात पुढे करीत आहेत. शहरातही असे अनेक युवक-युवती आहेत, जे सेवाभावातून विविध माध्यमातून जनजागृतीसह प्रत्यक्ष मदत करतांना दिसून येत आहेत.
हेही वाचा - भारनियमनामुळे ग्रामस्थ करतायत गर्दी !
घरपोच डब्बा देऊन मदतीचा हात
शहरातही संचारबंदी लागू आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी घरातच अडकून पडलेत. कुठे बाहेरही पडता येत नसल्यामुळे तर कुठे आर्थिक चणचण असल्यामुळे अनेकांनादेखील दोन वेळच्या जेवणाचीदेखील कशीबशी व्यवस्था करावी लागते. तर हातावर पोट असलेले अनेक ज्येष्ठांना ‘कोरोना’ बरोबरच पोटाच्या लढ्याचा देखील सामना करण्याची वेळ येऊ शकते. अशांसाठी येथील प्रभाग पाचचे नगरसेवक सचिन देशमुख, समाजसेविका नयना गुप्ता, रितेश जैन यांनी अशा ज्येष्ठांसाठी, विद्यार्थ्यांसाठी डब्बा देण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक नागरिक दररोज किमान एका व्यक्तीचा डबा जो काहीही असेल तो देऊ शकतो. म्हणून त्यांनी आपल्या मित्र परिवाराशी यावर चर्चा केली व ज्यांना खरोखरच गरज आहे, अशांना घरपोच डब्बा देऊन मदतीचा हात दिला आहे. अशा गरजूंनी सचिन देशमुख (९७६५०००७४), नयना गुप्ता (८७८८५१९६३०), रितेश जैन (९४२३१४२७३८) यांच्याशी संपर्क साधल्यास ते चार-दोन तासात डब्ब्याची व्यवस्था करणार असल्याचे नयना गुप्ता म्हणाल्या. तर श्री. देशमुख हे बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या तपासणीसाठी आग्रही असून अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांना तपासणीसाठी पाठवत आहेत. याच प्रभागाचे नगरसेवक चंद्रकांत शिंदे यांनी मास्क व सॅनिटायझरचे स्वच्छता कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे.
हेही वाचा - जिल्हा न्यायालयाने घेतला हा महत्वाचा निर्णय
प्रभाग चारमध्ये दररोज एका वसाहतीत स्वच्छता
प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरसेविका श्रीमती वनामाला देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय देशमुख यांनी दररोज एका वसाहतीत जाऊन खुल्या मैदानांची स्वच्छताप्रेमी नागरिक, कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छतेची कामे करीत आहेत. शुक्रवारी (ता.२७) त्यांनी आनंद नगर जैन मंदिर व महादेव मंदिर परिसर येथे ‘कोराेना’च्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान राबवले.
जनसेवा हिच ईश्वर सेवा...
संचारबंदीच्या काळात अनेकांना आपले कर्तव्य बजवावेच लागते. ते आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी असो की वृत्तपत्रमाध्यमातील कर्मचारी. संचारबंदीमुळे सर्व हॉटेल, उपहारगृहे बंद असल्यामुळे अनेकांना चहा-पाण्याविनाच तासंनतास सेवा द्यावी लागते. अशांसाठी येथील समाजसेवक धनंजय जोशी हे स्वखर्चाने गेल्या काही दिवसापासून कधी चहा तर कधी मठ्ठा असे पेय रस्त्यावरील या सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिरून देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.