बीड : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, या मागणीच्या आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे शासन स्तरावरून मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जात अशा जुन्या दस्तऐवजांचा शासन पातळीवर शोध घेतला जात आहे. यात जिल्हास्तरीय समित्यांना मराठवाड्यात जालना जिल्ह्यात सर्वाधिक २४९४ नोंदी आढळल्या आहेत. तर, त्याखालोखाल बीड जिल्ह्यात देखील २०७२ मराठा- कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात अशा नोंदी आढळल्या आहेत.
आठ जिल्ह्यांतील या समित्यांनी एक कोटी ४७ लाख ४१ हजार ९८५ नोंदींची तपासणी केली आहे. नोंदींच्या तपासण्यांत जालना नंतर बीड जिल्हा आघाडीवर आहे. मराठवाड्यात ५९९१ मराठा- कुणबी जातीच्या नोंदी जिल्हास्तरीय समित्यांना आढळल्या आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे बेमुदत उपोषण सुरु केल्यानंतर त्यांच्या उपोषणात सर्वाधिक गोदाकाठातील समाज बांधव सहभागी होते. यात जालना जिल्ह्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई व माजलगावच्या समाज बांधवांचा समावेश होता.
दरम्यान, शासनाने मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी वेळ मागितल्यानंतर मराठा- कुणबी, कुणबी- मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती स्थापन केली आहे.
तसेच, निजामकालीन दस्तऐवजांत तसेच जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर (गाव नमुना १४), खासरा पत्रक, पाहणी पत्रक, जनगणना रजिस्टर, गाव नमुना क्रमांक सहा, प्रवेश निर्गम रजिस्टर, हक्क नोंदवही या १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कागदपत्रांमध्ये मराठा- कुणबी, कुणबी- मराठा, कुणबी जात अशा नोंदी आहेत.
या नोंदींच्या तपासणीसाठी शासनाने जिल्हा स्तरांवर निवासी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, सहायक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पोलिस उपाधीक्षक (होम), अधीक्षक भूमि अभिलेख, अधीक्षक उत्पादन शुल्क या अधिकाऱ्यांच्या समित्यांकडून या नोंदींची तपासणी केली जात आहे.
अनेक नोंदी मोडी व उर्दू भाषात असून त्या तपासण्यासाठी अशा लिपींच्या अभ्यासकांचीही समितींकडून मदत घेतली जात आहे. याच धर्तीवर गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नोंदी आढळल्या आहेत.
या समित्यांनी मराठवाड्यात तब्बल एक कोटी ४७ लाख ४१ हजार ९८५ नोंदींची तपासणी केली आहे. यात ५९९१ मराठा- कुणबी, कुणबी- मराठा अशा नोंदी आढळल्या आहेत. सर्वाधिक २४९४ नोंदी जालना जिल्ह्यात आढळल्या असून, या खालोखाल बीड जिल्ह्यात २०७२ नोंदी आढळल्या आहेत. जालना जिल्ह्यात २० लाख ६१ हजार ९९७ नोंदींची तपासणी करण्यात आली. तर, बीड जिल्ह्यात १८ लाख ४९ हजार नोंदींची तपासणी करण्यात आली.
जिल्हानिहाय कुणबी जातीच्या नोंदी (ता. १६ पर्यंत)
जिल्हा - तपासलेल्या नोंदी - कुणबी जातीच्या नोंदी.
जालना - १९३७२५१ - २४९४
बीड - १८४९००० - २०७२ (ता. २६ पर्यंत)
छत्रपती संभाजीनगर - २३०९६६१ - ६८४.
परभणी - २०६१९९७ - ०४.
नांदेड - ९९१५२१w - ३१७.
लातूर - २१२०२३६ - ५१.
धाराशीव - २३४९१४३ - ३४४
हिंगोली - ११२३१७६ - २५
एकूण - १४७४१९८५ - ५९९१
जिल्हास्तरीय समिती भूमिअभिलेख, शिक्षण, महसूल अशा सर्व विभागांतील दस्तऐवजांची तपासणी करत आहे. उर्दू व मोडी लिपीतील नोंदी शोधण्यासाठी अशा अभ्यासकांचीही मदत घेतली जात आहे. याबाबत शासनाला नियमित अहवाल सादर केला जात आहे. नागरिकांनी आपले म्हणणे व पुरावे न्यायमूर्ती शिंदे समितीसमोर सादर करावेत.
— दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हाधिकारी, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.