Maratha Reservation : आंदोलनाची धग कायम आता महिलाही रस्त्यावर; जिल्ह्यात आंदोलनाचे सत्र सुरूच

आता आरक्षणाचा अध्यादेश काढल्याशिवाय माघार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून.
Maratha Reservation : आंदोलनाची धग कायम आता महिलाही रस्त्यावर; जिल्ह्यात आंदोलनाचे सत्र सुरूच
Updated on

बीड - मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे उपोषण सुरु केले आहे. १५ दिवसांनंतरही सुरूच असलेल्या या उपोषणाला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तालुकास्तरापासून गावपातळीपर्यंत आंदोलनाची पेटलेल्या वणव्याची धग अद्यापही कायम आहे.

मंगळवारी (ता. १२) माजलगावमध्ये महिलांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. शहरातून खासगी रुग्णवाहिका चालकांनी पाठिंबा देत सायरन वाजवत रुग्णवाहिका उपोषणाकडे रवाना केल्या आहेत.अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जचे पडसाद दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यात उमटले होते. जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

आता आरक्षणाचा अध्यादेश काढल्याशिवाय माघार न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, मराठा समाजबांधव एकत्र येत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. मागील आठ- दहा दिवसांपासून तालुकास्तरावर नव्हे तर गावपातळीवर आंदोलनाचा वणवा पेटलेला आहे. डोंगरकिन्ही, माजलगाव सारख्या ठिकाणी अनेक तरुणांनी जरांगे यांना पाठिंबा देत उपोषणे सुरु केली आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी दररोज बंद, रास्ता रोको, दुचाकी फेरी यासारखी आंदोलने होत असून, काही ठिकाणी हिंसक वळणही लागले आहे.

दहा दिवसांनंतरही जिल्हाभरात सुरु असलेल्या विविध आंदोलनाची धग आजही कायम आहे. मंगळवारी (ता. १२) माजलगाव येथे चक्क महिलांच रस्त्यावर उतरल्या. केसापुरी वसाहत येथे खामगाव- पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत महिलांनी आरक्षणाची मागणी केली. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. तहसील कार्यालय, संभाजी महाराज चौक येथे तरुणांचे बेमुदत उपोषण सुरु आहे.

राजकीय नेत्यांवर वाढतोय रोष

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला १५ दिवस होऊनही आरक्षणावर ठोस तोडगा निघत नाही, तर दुसरीकडे ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेते विरोध करत असल्याने मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांविरुद्ध तरुणांचा रोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरक्षणासाठी मंगळवारी गेवराई येथील तरुणांनी काढलेली दुचाकी फेरी थेट तेथील तिन्ही राजकीय नेत्यांच्या घरावर नेली.

या नेत्यांच्या घरासमोर तरुणांनी नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी केली. दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील एका मराठा तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना फोन लावत ‘तुम्ही आंदोलनात का, सहभागी होत नाहीत’, अशी थेट विचारणा केली. ओबीसीच्या नेत्याप्रमाणे आंदोलनात सहभागी न होणाऱ्या मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांविरुद्धाचा रोष तरुणांमध्ये वाढत चालल्याचे यावरून दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.