जालना : मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा निघण्यास तयार नाही. आंदोलक अन् राज्य सरकार तटस्थ भूमिकेत असल्याचे चित्र आहे. चर्चा नको थेट आरक्षणाचा अध्यादेश आणा अशी भूमिका उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याने राज्य शासनाकडून अद्यापही त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही.
केवळ अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडून निरोप दिले जात आहेत. मात्र, त्यावर श्री. जरांगे समाधानी नसल्याने मागील चार दिवसांपासून उपचार तर तीन दिवसांपासून पाणी बंद असल्याने श्री. जरांगे यांची प्रकृती ही खालावली आहे. शिवाय हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून रविवारपासून (ता. २९) गावागावांत बेमुदत उपोषण करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मागील ४४ दिवसांपासून अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे आंदोलन सुरू आहे. ता. २९ ऑगस्ट ते ता १४ सप्टेंबर दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केल्यानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी चाळीस दिवसांचा अवधी शासनाला दिला होता.
मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने पुन्हा ता. २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केले. मागील चार दिवसांपासून श्री. जरांगे हे वैद्यकीय उपचारही घेत नाहीत. शिवाय तीन दिवसांपासून त्यांनी पाणी देखील बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन या, अशी भूमिका उपोषणकर्ते यांनी घेतल्याने बेमुदत उपोषण सुरू होऊन चार दिवस झाल्यानंतरही राज्य शासनाच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांनी उपोषणकर्ते श्री. जरांगे यांच्याही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे उपोषणकर्ते अन् राज्य शासनाने ही तटस्थ असल्याने मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान शुक्रवारी (ता.२७) जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी शासन आपल्या मागणीवर गांभीर्याने विचार करत आहे. आंदोलनाबाबत सविस्तर माहिती शासनाला दिली जात आहे, आपण तब्येतीची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ व पोलिस अधीक्षक श्री. बलकवडे यांनी श्री. जरांगे यांना सांगितले.
धनगर नेत्यांचा पाठिंबा
मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मराठा समाजाप्रमाणे दगा फटका झाल्यास ५१ व्या दिवशी मराठा आंदोलकांसोबत धनगर समाज देखील राज्यातील सर्व पुढाऱ्यांना गावबंदी करेल असा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले आणि २१ दिवस धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे सुरेश बंडगर यांनी दिला आहे. या दोघांनी शनिवारी (ता.२८) अंतरवाली सराटी येथे उपोषणकर्ते. मनोज जरांगे यांची भेट घेतली.
तीन दिवस पाणी न पिल्यास अनेक आजार जडण्याची भीती असते. शरीरातील पाणी कमी होते. किडणीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. वजन कमी होते. शिवाय मेंदूचे विकारही होण्याची शक्यता असते. असा धोका असतानाही उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील हे उपचार घेण्यास नकार देत आहेत. त्यांना आज घडीला उपचाराची नितांत गरज आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे माहिती दिली आहे.
-डॉ. प्रताप घोडके, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.