औसा :- सध्या राज्यभर मराठा आरक्षणवरून जरांगे पाटील दौरे काढून सभा घेत आहेत. या सभांना मराठा समाजातील लहान थोर, वृद्ध, महिला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून जारांगेना आपला पाठिंबा दर्शवीत आहेत.
मराठा आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी औशातील एका तरुणाने तब्बल एकवीस किलोमीटर गुढग्यावर चालत येऊन जरांगेची सभा ऐकली. रामानंद लुंगसे रा. वरवडा ता. औसा असे या तरुणाचे नाव आहे.
मनोज जरांगेची औसा शहरात सभा होणार असल्याची माहिती वरवडा येथील तरुण रामानंद लुंगसे यांना समजली आणि त्यांनी निश्चय केला की मनोज जरांगे आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले व आता ते राज्यभर झंझावाती दौरे काढून मराठा समाजाला मार्गदर्शन करीत आहेत.
समाजासाठी जरांगे जर एव्हढ्या हालअपेष्टा सहन करू शकतात तर आपणही त्यांना साथ दिली पाहिजे. त्यासाठी त्यांनी वरवडा ते औसा हे एकवीस किलोमीटर असलेले अंतर आपल्या गुढग्यावर चालून रविवारी होणारी जरांगेची सभा ऐकायची ठरवली.
त्या प्रमाणे या तरुणाने सतत तीन दिवस हा प्रवास केला. या प्रवासादरम्यान वाटेतच असलेल्या टेंबी येथील मराठा आरक्षणासाठी जन्मभर संघर्ष केलेल्या मराठ्यांचे क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करून औशाकडे तो निघाला.
रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो मनोज जारांगेच्या सभास्थळी पोहोचला. एक तरुण मराठा आरक्षणासाठी व आपली सभा ऐकण्यासाठी एकवीस किलोमीटर अंतर हात आणि गुढग्यावर चालून आल्याचे जारांगेनी ऐकले व ते पण भारावून गेले.
त्यांनी या तरुणाला स्टेजवर बोलवले आणि आपल्या जवळ बसविले. त्यांचे भाषण संपल्यावर या तरुणाला जवळ बोलवून त्याच्या गळ्यात हार घातला व त्याच्या पाठीवर गालावर हात फिरवत त्याचे कौतुक केले.
जरांगेनी औशातील आपले भाषण सुरू करताच मध्येच थांबून स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांचे पुत्र दादासाहेब जावळे पाटलांना वर स्टेजवर बोलावले आणि आपल्या बाजूला उभे केले. स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांचा मराठा समाजासाठी असलेला लढा आणि त्यांचा संघर्ष हा मनोज जारांगेनी जवळून
बघितला असल्याने त्यांनी दादासाहेब जावळे पाटलांना पूर्ण भाषण आपल्या सोबतीला घेतले. यावरून सरकारला घाम फोडणारे जरांगे पाटील किती भावनिक आणि कनवाळू आहेत हे सभेला उपस्थित असलेल्या लाखो लोकांनी आज अनुभवले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.