महागाव - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध नोंदविला. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणाबाजीमुळे शहर दणाणुन गेले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी यागावात उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिकांनी पाठींबा देत मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले असताना पोलिस प्रशासनाने लाठीचार्ज केला.
त्यामध्ये महिला, शाळकरी विद्यार्थी, नागरिक गंभीर जखमी झाले. त्याबद्दल समाजामध्ये तीव्र संताप उमटला असुन, राज्यभर मराठा समाजाच्या भावनेचा उद्रेक होत आहे. त्याच अनुषंगाने महागाव तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने शिंदे-फडणवीस पवार सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
ही प्रेतयात्रा गोपिका भरवाडे ले आऊट मधुन सुरू होवुन मार्गक्रमण करीत असताना छत्रपती शिवराय चौकात आल्यानंतर माजी जि. प. सदस्य साहेबराव पाटील, तेजस नरवाडे, प्रमोद भरवाडे, प्रविण ठाकरे, गोविंदराव देशमुख, संदिप ठाकरे, प्रमोद जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून शासनाच्या मराठा समाजाप्रती उदासीन धोरणाचा निषेध केला.
त्यानंतर ही प्रेतयात्रा मार्गक्रमण करीत तहसिल कार्यालयाजवळ आल्यानंतर पोलिस प्रशासनाने प्रेतयात्रा व आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध करीत प्रचंड घोषणाबाजी करीत प्रेत यात्रा पोलिस स्टेशनवर मोर्चा नेला. यानंतर आंदोलकांनी जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जचा निषेध करून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात याव्या असे निवेदन दिले. यावेळी या प्रेत यात्रेत महागाव तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी दिपक पाटील ढोमणे, उपोनि केशव पुंजरवाड, सुरज काळे, बिट जमादार निलेश पेंढारकर, संतोष जाधव, दिनेश आडे, उदयसिंह उर्फ मुन्ना शुक्ला, विष्णु काईट, बालाजी मार्कंडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
महागाव उमरखेड तालुक्याचा त्या अध्यादेशात समावेश करा
शासनाने हैद्राबाद संस्थानच्या पुर्वीच्या असलेल्या कुणबी मराठा नोंदी लक्षात घेवुन मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली व त्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा सदस्य म्हणुन समावेश केला.
परंतु यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व उमरखेड हे दोन तालुके तत्कालीन हैद्राबाद संस्थान मध्ये समाविष्ट असुन निजाम राजवटीच्या अधिपत्याखाली होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मराठा समाजाच्या जातीच्या पुर्व नोंदी या सुद्धा मराठा कुणबी अशाच असल्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी काढलेल्या अध्यादेशात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व उमरखेड तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी सुद्धा आंदोलकांनी केली.
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेली प्रेतयात्रा महागाव शहरातील भरवाडे ले आऊट मधुन सुरू होवुन बस स्टँड चौक, तहसिल कार्यालय, जुने बस स्टँड मार्गे मार्गक्रमण करून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहचून तिथे सांगता होणार होती.
परंतु पोलिस प्रशासनाने ही प्रेतयात्रा तहसिल कार्यालयासमोर अडवून तेजस नरवाडे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर, संदीप ठाकरे, प्रविण ठाकरे, गोविदराव देशमुख, ओम देशमुख, राजु धोतरकर, यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेवून स्थानबद्ध केल्याने इतर आंदोलक बांधव आक्रमक होत त्यांनी ही प्रेतयात्रा महागाव पोलिस स्टेशनवर नेली होती.
विविध सामाजिक संघटनांचा पाठींबा
मराठा समाजाचा आरक्षणाची मागणी फार जुनी असुन शासन फक्त वारंवार समाजाची दिशाभुल करीत असल्याने, आता सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करून समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी करून मराठा समाजाच्या मागणीला तालुक्यातील भिमराव भालेराव, महेंद्र कावळे, सुदाम खंदारे, रविंद्र भारती, शिवानंद राठोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.